काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीमधील सर्वपक्षीय नेत्यांना गुरुवारी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. दिल्लीतील त्यांच्या घरी ही बैठक पार पडली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. याआधी इंडिया आघाडीची बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली होती.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपावर हल्ला केला. संध्याकाळी त्यांनी दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. गेल्या वर्षभरात आघाडीतील नेते पहिल्यांदाच दिल्लीत एकत्र आले आहेत. राहुल गांधी यांनी यावेळी नेत्यांसमोर कर्नाटकमधील एका लोकसभा मतदारसंघातील मतांची चोरी कशी झाली याचे पुरावे सादर केले. त्याआधी त्यांनी ते पत्रकार परिषदेत दाखवले होते.

वेगवेगळ्या राज्यातील नेत्यांची उपस्थिती

या बैठकीसाठी २५ पक्षांचे ५० नेते उपस्थित होते. ही बैठक इंडिया आघाडीतील ऐक्याचे प्रतीक असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. बिहारमध्ये विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर)वर संसदेत चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी एकत्र येणे ही योग्य दिशा असल्याचे मत नेत्यांनी यावेळी व्यक्त केले. या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, डिंपल यादव, राम गोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओ ब्रायन, शिवसेना (उबाठा)चे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, द्रमुकचे तिरुची शिवा, सीपीआयचे डी राजा, सीपीएमचे एम. ए. बेबी, सीपीआय (एमएल)चे दीपंकर भट्टाचार्य आणि मक्कल निधई मय्यमचे कमल हासन यांचा समावेश होता.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू व तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेदेखील उपस्थित होते. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सांगितले, “ही बैठक औपचारिक नव्हती आणि यात इतर विषयांवरही चर्चा झाली. मात्र, राहुल गांधी यांनी केलेल्या एसआयआरसंबंधित खुलासे हा चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू होता. विरोधकांनी संसदेत ज्या पद्धतीने एकत्रिपतपणे राष्ट्रीय हितासाठी सरकारला जाब विचारला, तीच एकजूट या बैठकीतही दिसून आली.”

उपाध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीवर या बैठकीत चर्चा झाली की नाही याबाबत काही माहिती मिळाली नाही; मात्र ही बैठक औपचारिक नव्हती. त्यामागे सर्व नेते एकत्र यावेत हा मुख्य उद्देश होता. वेगवेगळे मुद्दे पुढे येऊ शकतात, असेही ते म्हणाले.

सीपीआयचे सपरचिटणीस डी. राजा यांनी सांगितले, “ही फारच अर्थपूर्ण बैठक होती. एसआयआर आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, मतदान नोंदणी आणि ओळखीसंदर्भात अडचणी यांवर बैठकीत चर्चा झाली. राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन सादर करीत अनेक उदाहरणे दिली. त्यावेळी ते म्हणाले, बिहारमध्ये जे होत आहे ते देशभरात कुठेही होऊ शकते. “

फारूक अब्दुल्ला म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा आणि तिथे काही पुस्तकांवर घातलेली बंदी ही घटनाबाह्य आहे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. मी पाहिले की, कसे मत चोरले गेले. आमचा मुद्दा म्हणजे जम्मू-काश्मीरला परत राज्याचा दर्जा मिळावा. जे वचन दिलं होतं, ते अद्याप पूर्ण झालेलं नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगला हाताशी घेत भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच केंद्रीय निवडणूक आयोगाने कब्जा केल्याचा महाविकास आघाडीला संशय आला होता. महाराष्ट्रात लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या पाच महिन्यांमध्ये एक कोटी मतदार वाढले, ते अचानक कुठून आले, याबाबत संशय व्यक्त केला गेला आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांतील आणि मतदानातील घोटाळ्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने डिजिटल स्वरूपातील मतदार यादी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण होते. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटेजही दिले पाहिजे. हे फुटेज ४५ दिवसांमध्ये नष्ट करण्याचा निर्णय कशासाठी घेतला गेला हे स्पष्टच दिसते, असे राहुल गांधी म्हणाले.