सोलापूर : गेल्या सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त असताना ते भरण्याकडे पक्षश्रेष्ठी अर्थात सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दुर्लक्ष चालविले आहे. त्यामुळे जिल्हा ग्रामीण भागात पक्षाला कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तत्कालीन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून मंगळवेढ्याचे नेते, ॲड. नंदकुमार पवार यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. परंतु त्यांना स्वतःच्या मंगळवेढा तालुक्यातूनच पक्षाची बांधणी करताना मोठी दमछाक होत आहे. तर दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पक्षाला मोठे भगदाड पाडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या पश्चात अक्कलकोटमध्ये मल्लिकार्जुन पाटील, अशपाक बळोरगी, डॉ. सुवर्णा मलगोंडा आणि अरूण जाधव हे कसाबसा पक्ष सांभाळत आहेत.‌ दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद लक्षणीय स्वरूपात वाढली आहे.‌ एकूण सहापैकी पाच आमदार भाजपचे तर उर्वरीत एक आमदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आहे. कॅीग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. उलट, या पक्षाच्या उमेदवारावर अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की आली. शहरात पक्षाची अवस्था अतिशय कठीण आहे.‌

या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शहर कार्याध्यक्षपदी वडार समाजातून आलेले सनदी लेखापाल सुशील बनपट्टे यांना नियुक्त करण्यात आले आहे.‌ त्यांची ताकद केवळ वडार समाजापुरती सीमित आहे.‌ काँग्रेसकडे सध्या सर्व समावेशक चेहरा नाही. माजी आमदार दिलीप माने, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे ही मंडळी पक्षापासून दूर आहेत. ते कोणत्याही क्षणी राजकीय भूमिका ठरवून भाजपमध्ये प्रवेश करू शकतील. पक्षातून कोणी बाहेर पडत असताना त्यांना रोखणारे कोणी नाही. याउलट भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गणिते मांडायला सुरुवात केली आहे.‌

मागील २०१७ सालच्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे एकूण १०५ पैकी केवळ १४ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. आता त्याहून अधिक कठीण परिस्थिती दिसून येते. मुस्लीम, मोची समाजावर  उरलीसुरली राहिलेली भिस्तही आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आयुष्यात तब्बल ४५ वर्षे सत्ताकारणात राहून, लोकसभेचे सभागृह नेतेपदासह केंद्रीय गृहमंत्री, ऊर्जामंत्री तसेच राज्यात मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे असूनही त्यांच्याच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यात मजबूत पकड राहिलेल्या काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होत आहे. पक्षाची घडी बसवण्यासाठी नेतृत्व कमालीचे बेफिकीर असले की काय होते, हे पक्षाच्या नाजूक स्थितीवरून दिसून येते,