काँग्रेस नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अॅंटनी यांनी बीबीसीने प्रदर्शित केलेल्या माहितीपटावरून भाजपाची बाजू घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर अनिल अॅंटनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, काँग्रेसमध्ये असताना अनिल अँटोनी हे कधीच स्वत:ची ओळख निर्माण करू शकले नाहीत. दरम्यान, बीबीसी प्रकरणावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांची राजकीय कारकीर्दीवर धोक्यात आली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हेही वाचा – पंजाब : कुंवर विजय प्रताप सिंह यांचा शासकीय समितीचा राजीनामा भगवंत मान सरकारसाठी मोठा धक्का!
२०१७ मध्ये काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश
अनिल अँटोनी यांनी २०१७ मध्ये गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया समन्वयक बनवण्यात आले. त्यांना पक्षात आणण्यामागे तत्कालीन केरळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन आणि शशी थरूर यांचा मोठा वाटा होता. मात्र, सोशल मीडिया समन्वयकपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला. ए.के. अँटनी यांनी अनेक प्रतिभावान तरुणांना डावलून आपल्या मुलासाठी वरिष्ठांकडे बोलणी केल्याचा आरोप ए.के. अँटनी यांच्यावरही करण्यात आला.
अनिल अँटनी शशी थरूर यांच्या जवळचे?
अनिल अँटनी हे थरूर यांच्या जवळचे मानले जातात. विशेष म्हणजे त्यांनी काल दिलेल्या राजीनामा पत्रातसुद्धा थरूर यांचे आभार मानले. तसेच गेल्या वर्षी झालेल्या काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अँटनी हे थरूर यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी एक होते.
दोन वर्षांपासून सक्रीय राजकारणातून दूर
२०२१ च्या केरळ विधानसभा निवडणुकीदरम्यान अनिल अँटनी हे काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी होते. मात्र, त्यानंतर ते सक्रीय राजकारणात फारसे दिसले नाहीत. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी शशी थरूर यांच्या संदर्भात काही ट्वीट केले. मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे कोणतेही अपडेट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं नाही.
राजकीय कारकीर्दीवर धोक्यात?
दरम्यान, बीबीसीच्या माहितीपटावरील भूमिकेनंतर त्यांच्या राजकीय कारकीर्द धोक्यात आल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. अँटनी यांचे निकटवर्तीय असलेले काही युवक काँग्रेसचे नेतेही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेले नाहीत. त्यांनी ट्वीट डिलीट करून माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चांपासून दूर राहावं, अशी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ तथा आमदार व्हीडी साठेसन यांनी अँटनींच्या राजीनाम्याचं स्वागत केले आहे. “पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांनी पक्षात राहू नये. पक्षाची भूमिका त्यांना चांगलीच माहिती आहे. ज्यांची मते पक्षाच्या विचारधारेशी भिन्न आहेत, त्यांनी इतर पक्षात जावे, असं ते म्हणाले.