तिरुवनंतपुरम : इंडिया आघाडी सत्तेत आली तर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) रद्द केला जाईल असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात यासंबंधी उल्लेख केलेला नसला तरी ‘सीएए’ रद्द करण्याचा काँग्रेसचा मानस आहे असे ते म्हणाले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘सीएए’चा उल्लेख न केल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि माकप काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहेत.
हेही वाचा >>> शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी काय केले? शरद पवार यांचा सवाल
काँग्रेसचा जाहीरनामा अतिशय मोठा झाल्यामुळे त्यात ‘सीएए’चा उल्लेख नसल्याचे चिदम्बरम यांनी सांगितले. भाजपने आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात संसदेतील पाशवी बहुमताचा गैरवापर करून देशाचे प्रचंड नुकसान केले आहे अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, ‘‘कायद्यांची एक मोठी यादी आहे, ज्यापैकी पाच कायदे पूर्णपणे रद्द केले जातील. हे मी खात्रीने सांगतो, मी जाहीरनामा समितीचा अध्यक्ष आहे. त्यातील प्रत्येक शब्द मी लिहिला आहे, त्यामागील हेतू काय होता हे मला माहीत आहे. ‘सीएए’ रद्द केला जाईल, त्यामध्ये सुधारणा केल्या जाणार नाहीत. आम्ही हे स्पष्ट केले आहे.’’ काँग्रेसने ‘सीएए’ला विरोध केला नाही हा विजयन यांचा दावा चिदम्बरम यांनी खोडून काढला. ते म्हणाले की, काँग्रेस खासदार शशी थरूर संसदेत ‘सीएए’विरोधात बोलले आहेत. राम मंदिराचा या निवडणुकांवर काही परिणाम होईल का असे विचारले असता तसे होण्याची आशा नाही असे चिदम्बरम म्हणाले.