हृषिकेश देशपांडे

संघ,जनसंघाचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या ६७ वर्षीय जगदीश शिवाप्पा शेट्टर यांचा काँग्रेस प्रवेश धक्कादायक मानला जातो. उत्तर कर्नाटकमधील प्रभावी लिंगायत नेते अशी त्यांची ओळख. त्यांचे वडिल जनसंघाचे काम करत होते. हुबळी-धारवाडचे ते जनसंघाचे पहिले महापौर. त्यांचे काका सदाशिव कर्नाटकमधील जनसंघाचे पहिले आमदार, त्यामुळे घरातून त्यांना हा विचारांचा वारसा मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही जगदीश शेट्टर यांनी काम केले. संघ परिवारात विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तीने थेट काँग्रेसचा हात धरल्याने भाजपलाही धक्का बसला आहे.

कायद्याचे पदवीधर असलेल्या जगदीश शेट्टर यांनी हुबळीत २० वर्षे वकीली केली. सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. सध्या ते हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. १९९४ मध्ये पहिल्यांदा ते हुबळी ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर सातत्याने मताधिक्य वाढवत विजय मिळवला. २००५ मध्ये भाजप कर्नाटक प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. राज्यात भाजप स्वबळावर पहिल्यांदा सत्तेत आल्यावर २००८ मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. जुलै २०१२ ते मे २०१३ या कालावधीत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली. याखेरीज विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी सांभाळले. येडियुरप्पा तसेच सदानंद गौडा यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. स्वच्छ प्रतीमा तसेच कोणत्याही वादात न अडकता काम करणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे ते निकटवर्तीय. उत्तर कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्याबरोबर त्यांनी पक्षबांधणी केली. गेली तीन दशके ते भाजपशी संबंधित होते.

आणखी वाचा- “विरोधक एकत्र आल्यामुळे भाजपा नेते निराश”, नितीश कुमार यांची टीका; म्हणाले, “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत…”

शेट्टर यांनी भाजप सोडल्याने उत्तर कर्नाटकमधील भाजपच्या काही जागांवर परिणाम होण्याचा धोका आहे. लक्ष्मण सावदी यांच्या पाठोपाठ शेट्टर यांच्यासारख्या लिंगायत समुदायातील नेत्याने भाजप सोडल्याने वेगळा संदेश जाऊ शकतो याची पक्षाला चिंता आहे.राज्यात हा समाज भाजपचा पाठिराखा मानला जातो. तो १५ ते १७ टक्के आहे. सावदी हे काँग्रेस परंपरेतील होते. मात्र शेट्टर यांचे सारे कुटुंब संघ विचारात वाढले. आता शेट्टर यांना हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी अपेक्षित आहे. शेट्टर यांचे महत्त्व इतके आहे की, त्यांच्या पक्षप्रवेशाला काँग्रेसचे अध्यक्ष तसेच राज्यातील सारे नेते उपस्थित होते. तीस वर्षे पक्षात काम केल्यानंतर तो बाहेर जातो ही बाब भाजपसाठी अडचणीची आहे. शेट्टर यांचे किती समर्थक पक्षांतर करतात हा मुद्दा आहे. हुबळी-धारवाड महापालिकेतील समीकरणांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. दिल्लीत पक्षाने त्यांना मोठे पद देऊ केले होते असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केले असले तरी, उमेदवारी का नाकारली याचे उत्तर पक्षाकडे नाही. या साऱ्यात उमेदवारीसाठी पक्षनिष्ठा गौण ठरते हे मात्र दिसून आले.

आणखी वाचा- Karnataka : भाजपाला धक्क्यावर धक्के; माजी मुख्यमंत्री, लिंगायत नेते जगदीश शेट्टर यांचा राजीनामा, काँग्रेसच्या आशा पल्लवीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर कर्नाटकावर मदार

भाजपची सारी मदार ही बेळगावी, धारवाड, हुबळीचा समावेश होणाऱ्या पूर्वीच्या बॉ़म्बे कर्नाटक म्हणजेच उत्तर कर्नाटकावर सारी मदार आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने बेळगावी, धारवाड या प्रभाव क्षेत्रात भाजपला फटका बसू शकतो.