जळगाव : दोन माजी मंत्र्यांसह काही माजी आमदारांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकून अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व वेगवान घडामोडीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाला पडद्यामागून बळ देत शिवसेनेला (एकनाथ शिंदे) रोखण्याचा भाजपचा डाव असल्याची शंका घेतली जात आहे.
लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील मोठ्या यशानंतर जिल्ह्यात महायुतीचे घटक पक्ष भाजपसह शिंदे गटात काही महिन्यांपासून दुसऱ्या पक्षातून प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली होती. दोघांच्या तुलनेत अजित पवार गटात शांतताच होती. शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी समर्थकांसह प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करूनही त्यांना अजित पवार गटाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वेध लागताच अजित पवार गट आता कार्यरत झाला आहे. देवकर यांच्याबरोबर जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तसेच माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील आदींना गळाला लावण्यात अजित पवार गटाला यश आले आहे.
विशेष म्हणजे शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन आता अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री देवकर, डॉ. पाटील आणि इतर माजी आमदार यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व मातब्बर शिंदे गटाचे पूर्वापार कट्टर विरोधक राहिले आहेत. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतरही संबंधित सर्व जण पूर्वीचे मतभेद विसरून लगेच शिंदे गटाशी सहजपणे जुळवून घेतील किंवा नाही, त्याबद्दल शंका व्यक्त होत आहे. अशा स्थितीत, अजित पवार गटात शरद पवार गटातून होत असलेले मातब्बरांचे प्रवेश भविष्यातील निवडणुकांमध्ये आपली डोकेदुखी वाढवू शकतात, या विचाराने शिंदे गटात अस्वस्थता आहे.
शिंदे गटाचे आमदार असलेल्या जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा, पाचोरा, चोपडा या मतदारसंघावरच अजित पवार गटाने सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांना त्यांनी अजिबात धक्का लावलेला नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
शरद पवार गटाचे माजी मंत्री व काही पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने आम्ही अजिबात अस्वस्थ नाही. ते आमचे दोस्त आहेत का ? आम्ही नाही घाबरत कोणाला. पाच वर्षांनी त्यांनी पुन्हा मैदानात यावे, आम्ही कुस्ती खेळायला तयार आहोत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.गुलाबराव पाटील (मंत्री तथा नेते, शिवसेना-एकनाथ शिंदे गट, जळगाव)