राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली भारत जोडो यात्रा लवकरच जम्मू काश्मीरला पोहचणार आहे. मात्र ही यात्रा काश्मीरमध्ये पोहचण्याआधीच पक्षाला मोठा झटका लागला आहे. कारण पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि प्रवक्त्या दीपिका पुष्करनाथ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दीपिका पुष्कर नाथ या कठुआत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात वकील होत्या. आपल्या राजीनाम्याचं कारण लाल सिंह आहेत असं दीपिका पुष्कर नाथ यांनी सांगितलं आहे.

लाल सिंह कोण आहेत?

दीपिका पुष्कर नाथ यांनी आपण लाल सिंह यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचं सांगितलं आहे. लाल सिंह हे प्रदीर्घ काळापासून काँग्रेस खासदार होते. मात्र २०१५ मध्ये जेव्हा भाजपा आणि पीडीपी यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. कठुआ बलात्कार प्रकरणात लाल सिंह यांनी आरोपींची बाजू घेतली होती. तसंच त्यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती. पक्षाने याबाबत त्यांना फटकारलंही होतं मात्र लालसिंह यांनी ऐकलं नाही. त्यामुळे २०१८ मध्ये त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं.

दीपिका पुष्कर नाथ यांनी काय म्हटलं आहे?

लाल सिंह हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळेच आपण काँग्रेस पक्ष सोडत आहोत असं दीपिका पुष्कर नाथ यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरला जात आणि धर्मामध्ये वाटू पाहणाऱ्या व्यक्तीसोबत मी एकाच मंचावर बसू शकत नाही त्यामुले मी माझा पक्ष सोडते आहे असं दीपिका पुष्कर नाथ यांनी सांगितलं आहे. माझ्याकडे राजीनामा देण्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही असंही दीपिका पुष्कर नाथ यांनी स्पष्ट केलं.

दीपिका यांनी लाल सिंह यांना दुही माजवणारे असंही म्हटलं आहे

दीपिका पुष्कर नाथ म्हणाल्या की कठुआ बलात्कार प्रकरणात लाल सिंह यांनी बलात्काऱ्यांची बाजू घेतली होती. जम्मू काश्मीरमधल्या हिंदू आणि मुस्लीम समाजात दुही माजवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. वैचारिक पातळीवर मी अशा माणसासोबत कधीही एका मंचावर बसू शकत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडते आहे या आशयाची ट्विट्स दीपिका पुष्कर नाथ यांनी केली आहेत.

काय आहे प्रकरण?


२०१८ मध्ये कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरण घडलं होतं.त्यावेळी मुख्यमंत्री पदावर असलेल्या महबुबा मुफ्ती यांनी लाल सिंह चौधरी यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं. भारत जोडो यात्रेत लाल सिंह सहभागी होणार आहेत. १९ जानेवारीला ही यात्रा जम्मू मध्ये दाखल होणार आहे. अशात आता एक दिवस आधीच दीपिका पुष्कर नाथ यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा झटका मानला जातो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कठुआ प्रकरण काय होतं?


आठ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले होते. या मुलीचा मृतदेह तिच्या घरापासून काही अंतरावर झुडुपांमध्ये सापडला होता. या अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. पीडित मुलगी ही भटक्या समाजातली होती. आसिफा बेपत्ता झाली त्यानंतर तिचा मृतदेह आढळला होता. हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजलं होतं.