सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपालिका व दोन नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे असून त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेस नेते डॉ. विश्‍वजित कदम यांनी तयारी सुरू केली आहे. आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपपासून दूर गेलेल्या पुर्वासुरीच्या काँग्रेसच्या विचारात रूजलेल्या स्थानिक नेत्यांशी चर्चेचा पहिला टप्पाही पूर्ण केला असून सध्या मात्र, नगरपालिका निवडणुकीवर सर्वानीच लक्ष केेद्रित केले आहे.

वाळवा तालुक्यातील ईश्‍वरपूर आणि आष्टा या दोन नगरपालिका आमदार पाटील यांच्यादृष्टीने महत्वाची सत्ताकेंद्रे आहेत. ईश्‍वरपूरमध्ये जेष्ठ नेते अण्णा डांगे हे भाजपमध्ये सामील झाले असून त्यांना वगळून सत्ता काबीज करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. विरोधकांवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचा चेहरा त्यांनी आठ दिवसापुर्वीच जाहीर केला. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंंडे यांच्या नावाची त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी घोषणाही केली. या पाठोपाठ आष्टा नगरपालिकेसाठी माजी आमदार स्व. विलासराव शिंदे यांच्या गटाबरोबर युती करून शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी विशाल शिंदे यांच्या नावाची घोषणाही केली. आमदार पाटील यांच्या सत्ताकेंद्राला धडक देण्यासाठी विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ईश्‍वरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी विश्‍वनाथ डांगे यांचे नाव अंतिम होण्याच्या मार्गावर असले तरी अद्याप एकमत झालेले नाही. आमदार पाटील यांनी एकांगी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांची नाराजी आहे. ही नाराजी ओलांडून आमदार पाटील यांना आपला गड पुन्हा काबीज करायचा आहे. यासाठीची मोर्चेबांधणी सुरू आहे. घरच्या मैदानात व्यस्त असतानाही आमदार पाटील यांनी जतमध्येही लक्ष घातले आहे. या तुलनेत त्यांनी तासगावमध्ये फारसे लक्ष दिलेले नाही.

पलूसमध्ये काँग्रेसचे नेते डॉ. कदम घेतील तो निर्णय स्वीकारण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. मात्र, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे आता भाजपवासिय झाले आहेत. याचा फटका काही प्रमाणात बसू शकतो. याला डॉ. कदम कशी मात करतात हे या निवडणुकीत दिसणार आहे. या ठिकाणी देशमुखांच्या घराण्यात निर्माण झालेल्या भाउबंदकीचा लाभ काँग्रेस कसा घेते हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही निलेश येसुगडे यांच्या माध्यमातून सवता सुभा निर्माण केला असून तो भाजपला मारक ठरतो की काँग्रेसला तारक ठरतो हेही पाहणे औत्सुक्याचे आहे.

महाविकास आघाडी, महायुती यांच्या दृष्टीने नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुका स्थानिक पातळीवरील गटबाजी, पक्षिय राजकारण यांना केंद्रीभूत ठरतील. यामुळे आमदार जयंत पाटील, डॉ विश्‍वजित कदम यांनी या निवडणुकीत फारसे स्वारस्य दाखवल्याचे दिसत नाही. याउलट यानंतर होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवेळी भाजप विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील, जतमधून विलासराव जगताप, आटपाडीमधून राजेंद्र देशमुख यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. नगरपालिका निवडणुकीत कोणत्या नेत्यांला किती लोकाश्रय आहे यावर पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत. त्या दिशेने सध्या तरी मोर्चेबांधणी सुरू आहे. यात महायुतीतील काही नाराज मंडळींचाही उपयोग कसा करून घेता येईल याचे आडाखे बांधले जात आहेत.