सांगली : आमदार जयंत पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाले असताना विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचे पडद्याआड ते दावेदार होउ पाहत असताना जनतेने पक्षाला नाकारले. त्याचवेळी त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत होता.यापुढे त्यांची भूमिका पक्षाशी म्हणण्यापेक्षा पक्ष प्रमुख खा.शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे ते सांगत असले तरी त्यांच्या या शब्दावर विश्‍वास ठेवायला राजकीय धुरिण तयार नाहीत. कारण त्यांचे सांगली जिल्ह्यातील राजकारण हे विश्‍वासापेक्षा अधिक राजकीय कुरघोड्याचे म्हणूनच ओळखले जाते. नजीकच्या काळात ते फार मोठा निर्णय घेतील असे वाटत नसले तरी एकंदरित राज्याच्या राजकारणातील जिल्ह्याचे महत्व कमी झाले हेही मान्यच करावे लागेल.

आठ वर्षापुर्वी आमदार पाटील यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आले. त्यावेळीही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरत होत्या. २०१४ मध्ये मोदी लाटेवेळी सांगलीत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी यामागे आमदार पाटील यांची कूटनीती होती असे आजही मानले जाते. जिल्ह्यातील वसंतदादा घराण्याचे राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी महापालिका निवडणुकीत विकास आघाडीचा प्रयोग करत असताना त्यांनी भाजपलाही सोबत घेतले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. भाजपची ताकद वाढविण्यात जे आज चेहरे समोर दिसतात, त्यापैकी अनेक चेहरे आमदार पाटील यांच्यासोबत एकेकाळी उठबस करत होते. यामुळे जिल्ह्यातील भाजपला एकेकाळी जयंत जनता पार्टी म्हणजेच जेजेपी असेही संबोधले जात होते. यामुळे भाजपला बस्तान बसविण्यासाठी आमदार पाटील यांची कूटनीती मदतीची ठरली हे सामान्य माणूसही मान्य करेल.

आमदार जयंत पाटील १९९० पासून विधानसभेचे आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्याचे अर्थ, ग्रामीण विकास, गृह, जलसंपदा या विभागाचे मंत्रीपद सांभाळले आहे. वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना राजकारणात संधी मिळाली. त्यावेळी काँग्रेसचे आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत आले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आजअखेर बदलला नाही. या काळात त्यांचा सत्तेतच अधिक काळ गेला आहे. सत्तेत असल्याने त्यांचे राजकीय संबंध राज्यस्तरावर निर्माण झाले असले तरी विधानसभेत आमदारांचा गट करण्यात त्यांना अद्याप यश आले नाही. यामुळेच महाविकास आघाडीची सत्ता जाउन महायुतीची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्ष नेते पदही त्यांना मिळाले नाही.

गेली सात वर्षे पक्षाचे नेतृत्व करत असताना आपला राज्याचे प्रमुख म्हणून चेहरा जनतेसमोर जावा यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढूनही त्यांना फारसे यश आले नाही. लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीला चांगली संधी मिळेल असे वाटत असताना महायुतीने दणदणीत यश मिळवत विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदही मिळणाार नाही अशी परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पद मिळवण्याची आमदार पाटील यांची आशा ही आशाच उरली आहे. आता प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याचे राज्य पातळीवरील राजकीय महत्वही कमी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय संपादन करता आला असला तरी मताधिक्य लाखाचे बारा हजारावर आले. विजयासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या निशीकांत भोसले-पाटील यांच्याशी झुंजावे लागले. त्यांच्या तालुक्यातील ४८ गावांचा समावेश असलेल्या शिराळा मतदार संघातील पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. आजच्या घडीला तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील हे पक्षाचे आमदार असले तरी त्यात जयंत पाटील यांचा सहभाग फारसा नाही. आता त्यांना स्वत:च्या राजकीय भवितव्यापेक्षा राजकीय वारस म्हणून पुढे आणलेल्या पुत्र प्रतिक पाटील यांच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. त्यांच्यासाठी ते काहीही करू शकतील अशी परिस्थिती आहे. भाजपमध्ये जाणारं नाही असे ते सांगत असले तरी यावर विश्‍वास न ठेवता ते काहीही करू शकतात यावर मात्र सामान्यांचा ठाम विश्‍वास आहे.