दयानंद लिपारे

शिवसेना हाच ध्यास

शिवसेना हाच ध्यास आणि श्वास असे व्यक्तिमत्त्व असलेले सामान्य शिवसैनिक म्हणजे संजय पवार. शिवसेनेने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन सामान्य शिवसैनिकांचा गौरव केला आहे. गेली ३४ वर्षे एकनिष्ठ राहून सेनेचा भगवा उंचावण्यासाठी लढणारे पवार यांना आजवर शिवसेनेने राज्यात लोकप्रतिनिधी होण्याची संधी दिली नव्हती. आता थेट त्यांना नवी दिल्लीत खासदार म्हणून पाठवण्याची तयारी केली असल्याने सामान्य शिवसैनिकांनाही हुरूप चढला आहे. गेला संबंध आठवडा राजकीय चर्चा ही संभाजीराजे छत्रपती या नावाभोवती फिरत होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना शिवसेना पाठिंबा देणार की ते शिवसेना प्रवेश करत निवडणूक लढणार हाच चर्चेचा विषय होता. यामध्ये अखेर ‘छत्रपतीं’ना शह देत शिवसेनेने एका सामान्य मावळ्याची निवड केल्याने संजय पवार हे नाव एकदम चर्चेत आले. त्यातून गेल्या दोन दिवसात एकदम सर्व चर्चा ही या एका नावाभोवतीच सुरू राहिली.

मावळ्याला साजेसे व्यक्तिमत्त्व

शिवसैनिक स्वतःला मावळा म्हणून घेतात. संजय पवार यांचे व्यक्तिमत्त्वही मावळ्याला साजेसे. बलदंड शरीर, झुपकेदार मिशा, सैनिकाला साजेसा खडा आवाज, खांद्यावर भगवा, ओठात सेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव आणि शिवसेनेच्या कोणत्याही उपक्रमाच्या पालखीचा भोई होण्याची तयारी. असे त्यांचे अवघे शिवसेनामय व्यक्तिमत्त्व.

सैनिक ते जिल्हाप्रमुख

१९८९ साली त्यांनी सेनेचा भगवा हाती घेतला. आपल्या कामाने वर्षभरातच इतका प्रभाव पाडला, की पुढच्याच वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. पुढच्या निवडणुकीत त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केली. २००५ साली महापालिका सभागृहात जाण्याचा पराक्रम नोंदवतांना विरोधी पक्षनेतेही झाले. करवीर तालुका प्रमुख, कोल्हापूर शहर प्रमुख अशी पदे भूषवली. २००८ मध्ये त्यांची जिल्हाप्रमुख पदावर निवड झाली. शिवसेनेशी एकनिष्ठ असले तरी पक्षांतर्गत मतभेद होतच राहिले. स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरून त्यांना डावलण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेना, शिवसेनाप्रमुख यांच्यावर असणाऱ्या निस्सीम प्रेमामुळे ते टिकून राहिले. २०१८ मध्ये त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद देण्यात आले. या निमित्ताने त्यांना राज्यमंत्री दर्जा अनुभवता आला. दोनच वर्षे या पदावर काम करताना त्यांनी मराठा समाजातील सर्वसामान्य तरुणांना महामंडळाच्या योजनांचा आर्थिक लाभ मिळवून देऊन स्वयंरोजगारास प्रवृत्त केले. ताराबाई पार्क येथील ‘अनंत’ या त्यांच्या बंगल्यावर सदैव भगवा ध्वज फडकत असतो. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्यामुळे त्यांनी तरुण शिवसैनिकांवरही छाप पाडली.

सारे गेले पुढे

तरीही खरे तर गेली दोन दशके ते कोल्हापूर शहर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळत नव्हती. सुरेश साळोखे तर कधी राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळून ते आमदारही झाले. पवार मात्र पक्षाचे पाईक म्हणून जिल्हाभर फिरत राहिले. ३४ वर्ष रस्त्यावर उतरून शिवसेनेसाठी लढाई करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा सन्मान आता राज्यसभेचे उमेदवार म्हणून होताना दिसत आहे. शिवसेनेने दिलेल्या या संधीबद्दल आपण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कृतज्ञ असल्याचे संजय पवार नमूद करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसैनिकांना आनंद

त्यांना राज्यसभेसाठी संधी देत असल्याने कोल्हापुरातील शिवसैनिकांनाही आनंद झाला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन थेट दिल्लीला पाठवल्याबद्दल विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. त्यांच्यासमवेत सीमाप्रश्न, मराठी भाषिक, मराठी पाट्या यांसह जनहिताच्या प्रश्नासाठी आंदोलन करून अटकेची कारवाई झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.