काही दिवसांपासून सातत्याने भाजपा नेत्यांकडून महिला अधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधाने करण्यात येत आहेत. अलीकडेच कर्नाटकमधील भाजपा आमदाराने मुस्लीम आयएएस अधिकाऱ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटक भाजपा नेते एन. रविकुमार यांनी कलबुर्गी येथील उपायुक्त फौजिया तरनुम या मुस्लीम आयएएस महिला अधिकाऱ्याच्या विरोधात बदनामीकारक विधान केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय? जाणून घेऊ…
भाजपा नेत्याचे आक्षेपार्ह विधान
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चालवाडी नारायणस्वामी यांनी कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या व्यक्तव्याचा काँग्रेसने तीव्र निषेध करीत त्यांना घेराव घातला आणि त्यांना सरकारी अतिथिगृहात बंदिस्त करण्यात आले. याच्याच विरोधात रविकुमार यांनी महिला उपायुक्तांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. जिल्हा प्रशासन सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारसाठी काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी कलबुर्गी येथील उपायुक्त फौजिया तरनुम यांच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले, “त्या पाकिस्तानातून आल्या आहेत, असे वाटते.”
नारायणस्वामी यांना २१ मे रोजी चित्तपूरच्या भेटीदरम्यान काँग्रेस समर्थकांनी सरकारी अतिथिगृहात डांबून ठेवल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांची तुलना कुत्र्याशी करीत त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अतिथिगृहात डांबून ठेवल्याच्या वृत्ताचा निषेध करीत रविकुमार म्हणाले होते, “कलबुर्गीच्या उपायुक्त पाकिस्तानातून आल्या आहेत की येथील आयएएस अधिकारी आहेत हे मला माहीत नाही. तुमच्या टाळ्या पाहून असे वाटते की, त्या खरोखरच पाकिस्तानातून आल्या आहेत.”
त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी एका प्रेस निवेदनाद्वारे माफी मागितली. त्यांनी म्हटले की, त्यांच्या अनवधानाने केल्या गेलेेल्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल पश्चात्ताप आहे आणि त्यांना महिला उपयुक्तांच्या प्रामाणिकपणा किंवा क्षमतेबद्दल कोणताही संशय नाही.
काँग्रेसचा विरोध
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी रविकुमार यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि ही टीका अत्यंत घृणास्पद असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “देशभरातील भाजपा नेते ज्या प्रकारची भाषणे करतात, ते पाहिल्यावर त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. एका आदरणीय अधिकाऱ्यावर असे आरोप करणे अस्वीकार्य आहे”, असे ते म्हणाले. त्यांनी म्हटले, “जे लोक स्वतःच्याच नागरिकांबद्दल असे बोलतात, त्यांना आपण खरे भारतीय म्हणू शकतो का? ते स्वतःच समाजविरोधी आहेत.” मुख्य म्हणजे आयएएस ऑफिसर्स असोसिएशननेही भाजपा नेत्याच्या वक्तव्याचा निषेध केला आणि बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली. तसेच त्यांच्याकडून अधिकाऱ्यांना आमदाराविरोधात योग्य कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
भाजपा आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल
कलबुर्गी उपायुक्तांविरुद्ध केलेल्या बदनामीकारक विधानाबद्दल कलबुर्गी पोलिसांनी आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कलबुर्गी समुदायाचे अध्यक्ष दत्तात्रय इक्कलाकी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीवरून स्टेशन बाजार पोलिसांनी रविकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तरतुदींचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.