scorecardresearch

Karnataka Election 2023 : शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत, जेडीएस पक्षाकडून वेगवेगळी आश्वासनं; पाच कलमी कार्यक्रम जाहीर

जेडीएस पक्षातर्फे ९९ दिवसांची पंचरत्न यात्रा आयोजित करण्यात आली होती. म्हैसूर येथे या यात्रेची सांगता झाली.

KARNATAKA JDS
जेडीएस पक्षाने कर्नाटकमधील जनतेला अनेक आश्वसनं दिली आहेत. (फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. ही निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. तर सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून आकर्षक निर्णय घेतले जात आहेत. असे असतानाच जेडीएस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला असून महिला, शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासनं दिली आहेत.

हेही वाचा >>> कर्नाटकमधील मुस्लिमांचे आरक्षण रद्द, अमित शाहांकडून निर्णयाचे स्वागत, म्हणाले “काँग्रेसकडून…”

आर्थिक मदत योजना राबवू, महिला बचत गटांचे कर्ज माफ करू

जेडीएस पक्षातर्फे ९९ दिवसांची पंचरत्न यात्रा आयोजित करण्यात आली होती. म्हैसूर येथे या यात्रेची सांगता झाली. यात्रेच्या समारोप कार्यक्रमात एच डी कुमारस्वामी यांनी पाच कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. आम्ही सत्तेत आल्यास सर्व आश्वासनं पूर्ण करू, अशी हमी यावेळी कुमारस्वामी यांनी दिली आहे. आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत योजना राबवू, महिला बचत गटांचे कर्ज माफ करू, ४० लाख रुपयांपर्यंत कुटंबाला वैद्यकीय मदत दिली जाईल, ग्रामपंचायत पातळीवरील सर्व शासकीय शाळांमधून इंग्रजी आणि कन्नड माध्यमातून शिक्षण देण्याची तरतूद केली जाईल, शेतकऱ्यांना बियाणे आणि खत खरेदीसाठी १० एकरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना प्रति एकर १० हजार रुपये दिले जातील, अशी आश्वासनं पाच कलमी कार्यक्रमात देण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> मालेगावात मुस्लीम समुदायाबरोबर जोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न

….त्यावेळी मोदी काहीही बोलले नाहीत

यावेळी कुमारस्वामी यांनी काँग्रेस आणि भाजपावर जोरदार टीका केली. “कर्नाटकमध्ये पूर आला तेव्हा शेतकरी संकटात सापडला होता. या काळात पंतप्रधान मोदी एकदाही कर्नाटकमध्ये आले नाहीत. आता मात्र ते लाभार्थ्यांचे मेळावे घेत आहेत. मागील तीन वर्षांत त्यांनी काहीही केले नाही. पीकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत होते. त्यावेळी मोदी काहीही बोलले नाहीत,” अशी टीका कुमारस्वामी यांनी केली.

हेही वाचा >>> संभाजीनगर की औरंगाबाद ? महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच मतभिन्नता

धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा आमचा अजेंडा नाही

दरम्यान, जेडीएस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच डी दैवगौडा प्रकृतीच्या कारणास्तव सार्वजनिक बैठका, सभांमध्ये शक्यतो दिसत नाहीत. मात्र त्यांनीदेखील आमचा पक्ष निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला. “जात आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा आमचा अजेंडा नाही. अगोदर ब्रिटिश अशी रणनीती राबवायचे. स्वातंत्र्यानंतर काही राजकीय पक्षांनी हाच अजेंडा समोर सुरू ठेवला,” असे दैवगौडा म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 19:58 IST

संबंधित बातम्या