सुहास सरदेशमुख छत्रपती संभाजीनगर : भाषणात कोणी चुकूनही औरंगाबाद म्हटले तर खालून ‘ संभाजीनगर’ म्हणा असे शिवसैनिक आवर्जून सांगतात. हिंदूत्व या मुद्दयांवर महाविकास आघाडीतील मतभेदाचे मुद्दे कार्यकर्त्यांच्या पातळीवर आहेत. त्यात मालेगावरच्या सभेनंतर ‘ स्वातंत्र्यवीर सावरकर‘ यांच्या अपमानाच्या मुद्दयाचा नव्याने समावेश झाल्यानंतर ‘ महाविकास आघाडी’ तील कार्यकर्त्यांमध्ये राजकीय मनोमीलन घडवून आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यशस्वी होतील का, याविषयीच्या शंका घेतल्या जात आहेत. मात्र, ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाची ताकद अधिक त्या जिल्ह्यात शिवसेना- राष्ट्रवादी व कॉग्रेसमधील कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये एकत्र ठेवणे हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांसाठी अवघड काम असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीने सरकार तर एकत्रितपणे चालविले. मात्र, जिल्हा, तालुका व गावस्तरावरील कार्यकर्त्यांना ‘ महाविकास आघाडी’ चा एकत्रित संदेश कधी दिला गेला नाही. करोनामुळे आणि नंतरच्या राजकीय घटनांमुळे जिल्हास्तरावर सारे पक्ष आपापले कार्यक्रम स्वतंत्रपणेच आखत हाेते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्ते एकमेकांविरोधात निवडणूक लढवितात. एखाद्या कार्यकर्त्यास एका पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर तो अन्य पक्षातून लढतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणूक काळात ‘ महाविकास आघाडी’ची वज्रमूठ बांधून ठेवण्यासाठी २ एप्रिलपासून राज्यात सहा ठिकाणी सभा होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील सभा पहिली असल्याने ती अधिक गर्दीची असावी असे प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहे. या सभेच्या तयारीच्या बैठकीतच मनोमिलनातील मतभेदाचे मुद्दे चर्चेत आले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार सतीश चव्हाण बोलण्यास उभे ठाकले आणि त्यांनी शहराचा उल्लेख ‘ औरंगाबाद’ असा केला. त्यांनी जसे हे नाव उच्चारले तसे शिवसैनिक म्हणाले, ‘ संभाजीनगर म्हणा’., त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, तुम्ही अगदी अनेक दिवसापासून संभाजीनगर म्हणता. आता नाव तोंडात बसायला काही काळ लागेल. मग बोलताना ते पुन्हा औरंगाबाद म्हणाले शिवसैनिकांनी त्यांना पुन्हा चुूक दूरुस्त करण्याची सूचना केली. मग कधी संभाजीनगर, कधी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करत त्यांनी भाषण पूर्ण केले. शेवटी त्यांना बदल करण्यासाठी वेळ द्याायला हवा, असे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना सांगावे लागले. आता या मुद्दयांमध्ये वीर सावरकारांच्या मुद्दयाची भर पडणार आहे. त्यामुळे मनोमीलनातील मतभेदाचे मुद्दे गावस्तरावर कसे स्वीकारले जातात यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. हेही वाचा. सूरजागडविषयी काँग्रेसच्या भूमिकेने संभ्रम ? हेही वाचा. चंद्रशेखर राव यांना राज्यात पाठिंबा मिळणार? छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेतील नेत्यांमध्ये झालेली विभागणी, कार्यकर्त्यांमध्ये किती विभागलेली आहे, याचा अंदाज घेण्यासाठी गर्दी जमिवण्यात दोन्ही बाजूने जोरदार प्रयत्न होतात. ‘ वज्रमूठ’ सभा विरुद्ध ‘धनुष्यबाण मिरवणूक’ अशी रचना दोन्ही बाजूने एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे, कॉग्रेस अध्यक्ष नाना पटोले, अशोकराव चव्हाण, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या सभेत ‘ मुस्लिम’ मतदारांची संख्याही गर्दीमध्ये ठसठशीत दिसून येईल, असे नियोजन केले जात आहे. सभेच्या तयारी म्हणून ‘ मुस्लिम’ वस्त्यांमध्येही सभेसाठी आमंत्रण देऊ असे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आवर्जून सांगितले. शिवसेनेतील हा बदल अधिक महत्त्वपूर्ण मानला जात आहे.