आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी (२६ डिसेंबर) कोलकाता येथे दिवसभर भेटीगाठी आणि बैठका घेतल्या. यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील पक्षाच्या तयारी आणि रणनीतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी शाह आणि नड्डांनी पश्चिम बंगालमधील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेत त्यांना निवडणुकीची तयारी वाढवण्यास सांगितले. “आता वाया घालवण्यासाठी वेळ नाही आणि कोणत्याही आत्मसंतुष्टतेला जागा नाही,” असा स्पष्ट संदेश या बैठकीत देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शाह-नड्डा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १५ सदस्यीय निवडणूक व्यवस्थापन समितीही तयार केली. या निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमधील ४२ पैकी ३५ लोकसभा जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे. शाह आणि नड्डांनी या दौऱ्याची सुरुवात दक्षिण कोलकाता येथील गुरुद्वारा आणि कालीघाट मंदिराला भेट देऊन केली. त्यानंतर कोलकात्यातील एका हॉटेलमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्षांबरोबर बंद दाराआड बैठक घेतली.

“शाह आणि नड्डा यांचा संदेश फार स्पष्ट”

या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत शाह आणि नड्डांनी कोणतीही माहिती दिली नाही. असं असलं तरी या बैठकीत उपस्थित असलेल्या भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं, “शाह आणि नड्डा यांचा संदेश फार स्पष्ट आहे. या लोकसभा निवडणुकीत ३५ जागांसाठी पूर्ण तयारीला लागायचं आहे. ही तयारी करताना केवळ लोकांपर्यंत पोहोचायचे नाही, तर बूथपासून जिल्हा स्तरापर्यंत पक्ष संघटना मजबूत करायची आहे.”

१५ सदस्यीय समितीत १० बंगालच्या भाजपा नेत्यांचा समावेश

१५ सदस्यीय समितीत १० बंगालच्या भाजपा नेत्यांचा समावेश आहे. यात बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांतो मजुमदार, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि राहुल सिन्हा, आमदार अग्निमित्रा पॉल, खासदार लॉकेट चॅटर्जी, सरचिटणीस (संघटन) अमिताव चक्रवर्ती, सरचिटणीस जगन्नाथ चट्टोपाध्याय, दीपक बर्मन, खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांचा समावेश आहे. याशिवाय अमित मालवीय, सतीश धोंड, आशा लाक्रा, मंगल पांडे आणि सुनील बन्सल या पाच केंद्रीय नेत्यांचाही समावेश आहे.

भाजपा बंगाल समितीत चार केंद्रीय मंत्र्यांपैकी कोणीही नाही

विशेष म्हणजे या समितीत सुभाष सरकार, जॉन बारला यांच्यासह चार केंद्रीय मंत्र्यांपैकी कोणीही नाही. निशिथ प्रामाणिक आणि शंतनु ठाकूर यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

४२ लोकसभा जागांच्या अहवालांवर चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहांनी घेतलेल्या बैठकीत बूथ, मंडळ आणि ४२ लोकसभा जागांच्या अहवालांवर चर्चा करण्यात आली. तसेच बंगाल भाजपासाठी संदेश देण्यात आला की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या विजयामुळे आत्मसंतुष्ट होऊ नका. एका भाजपा नेत्याने सांगितले, “आम्हाला सांगण्यात आले की, बंगालमध्ये वेगळी राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अधिक जागा जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. गेल्या वेळी जिंकलेल्या १८ जागांवरच नाही, तर यावेळी भाजपाला जिंकण्याची संधी आहे अशा नवीन जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

“२०२४ मध्ये भाजपा पश्चिम बंगालमध्ये ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल”

सायंकाळी शाह यांनी बंगाल भाजपाच्या सोशल मीडिया आणि आयटी कार्यकर्त्यांनाही संबोधित केले. ते म्हणाले, “२०२४ मध्ये भाजपा पश्चिम बंगालमध्ये ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. बंगालमधील भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षासाठी इतिहासातील सर्वात मोठा त्याग केला आहे आणि हौतात्म्यही पत्करले. जर आपण शून्यापासून ७७ जागांपर्यंत पोहचू शकतो, तर दोन तृतीयांश बहुमताने सरकारही स्थापन करू शकतो.”

“मुखर्जींच्या भूमीतून मोदींना ३५ जागा द्या”

“श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमीतून मोदींना ३५ जागा द्या, मी हमी देतो की, मोदी ‘सोनार बांगला’ बनवतील”, असंही शाह यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला १८ जागांवर विजय मिळाला होता, तर तृणमूल काँग्रेसने २२ जागांवर विजय मिळवला होता. असं असलं तरी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीने २१३ जागांवर विजय मिळवला होता. दुसरीकडे भाजपाला फक्त ७७ जागा मिळवता आल्या होत्या. त्यामुळे ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा बंगालमध्ये सत्तेवर आल्या होत्या.