कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची तयारीकडे लक्ष असतानाच आता काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या मोर्चेबांधणीवर जोर दिला आहे. जिल्ह्याचा दौरा करून पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवारांची चाचपणी करून कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काँग्रेसच्या ग्रामीण भागातील रखडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, या पातळीवर सतेज पाटील यांना महाविकास आघाडी , इंडिया आघाडीची एकाकी धुरा सांभाळावी लागत असून एकहाती सामना ते कसा जिंकणार हे लक्षवेधी ठरले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने धवल यश मिळवताना सर्व दहा जागा जिंकल्या. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेही जिल्ह्यात पानिपत झाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात महाविकास आघाडी, इंडिया आघाडीने हालचाली सुरू केल्या आहेत.कोल्हापूर , इचलकरंजी या महापालिका पातळीवर निवडणुकांना महाविकास आघाडीने गती दिली आहे.

त्यापैकी कोल्हापूर महापालिकेवर सतेज पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागाकडे लक्ष पुरवलेले आहे. राधानगरी, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, शिरोळ तालुक्यांमध्ये त्यांनी घेतलेल्या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना सोबत करीत पाठबळ दर्शवले. आमदार पाटील यांनी गडहिंग्लज, आजरा, चंदगड, जयसिंगपूर, कुरुंदवाड , शिरोळ या नगरपालिकांसाठी मोर्चेबांधणी करतानाच नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.

विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामीण भागात आलेली मरगळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. पण या पातळीवर त्यांना एकाकी झुंज द्यावी लागत आहे. संपूर्ण जिल्ह्याचा आवाका असेल असा सतेज पाटील वगळता एकही नेता महाविकास, इंडिया आघाडी मध्ये नाही. ही या आघाडीची नेतृत्वाची मोठी उणीव आहे. काँग्रेसचे शाहू महाराज हे खासदार असले तरी त्यांचा ग्रामीण भागातील राजकीय वावर अद्यापही मर्यादितच आहे. त्यामुळे एकाकी झुंज देणारे सतेज पाटील हे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा गड कितपत राखणार का हाही प्रश्न आहे.

शिरोळ व गडहिंग्लज येथे बोलताना सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी हात मिळवणी करण्याचे संकेत दिले. मात्र स्वाभिमानी कडून तूर्तास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. ऊस दराच्या प्रश्नाबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही तोवर निवडणुकीच्या विषयावर चर्चा केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेली आहे. त्यामुळे याही पातळीवर सतेज पाटील यांची कोंडी झाल्याचे दिसून येते.