जळगाव : विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरासाठी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पक्षाच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्याची शिक्षा म्हणून नंतर पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाने पाटील यांना आता थेट जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्यासाठी माजी महापौर जयश्री महाजन आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती. प्रत्यक्षात जयश्री महाजन यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. विशेष म्हणजे त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत महाजन यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे तसेच माजी नगरसेवक अमर जैन यांच्यासह अन्य बरेच समर्थक उपस्थित होते. प्रचार आघाडीवरही पाटील यांनी महाजन यांच्यावर मात केली होती. मत विभाजन झाल्याचा फटका ठाकरे गटाला निवडणुकीत बसला.

शिस्तभंग केल्याबद्दल पाटील यांची नंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, त्यांच्याबरोबर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते दुरावल्याने ठाकरे गटाचे पक्ष संघटन आणखी खिळखिळे झाले. चूक लक्षात आल्यानंतर ठाकरे गटाने पाटील यांचे निलंबन रद्द करून त्यांना आता पुन्हा पक्षात मानाचे स्थान दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१ मध्ये महापौर व उपमहापौर निवडणुकीवेळी गिरीश महाजन यांना हुलकावणी देत भाजपच्या तब्बल २७ नगरसेवकांना फोडून पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने महापालिकेवर झेंडा फडकावला होता. तेव्हापासून शहरात शिवसेनेचा चांगला दबदबा सुद्धा निर्माण झाला होता. ठाकरे गटाला पुन्हा नवी ताकद मिळवून देण्यासाठी त्यामुळेच पाटील यांना मोठी जबाबदारी दिली गेली आहे. त्यांच्याबरोबर ठाकरे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवणारे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचीही जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या संघटकपदी नियु्क्ती झाली आहे. पाटील आणि पवार यांच्या रूपाने मराठा समाजाचे दोन प्रभावी चेहरे पक्षात सक्रीय झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत सामाजिक समीकरणे जळवून आणण्यात ठाकरे गट कितपत यशस्वी होतो, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.