जनसुरक्षा विधेयकावरील चर्चेत जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना पी. चिदम्बरम यांच्या ‘पीएमएलए’ कायद्याची आठवण करून दिली. ‘पीएमएलए’ कायद्यात सुधारणा करताना कठोर तरतुदी करण्यासाठी चिदम्बरम यांनी पुढाकार घेतला. सत्ताबदलानंतर या कायद्यान्वये चिदम्बरम यांनाच तुरुंगात टाकण्यात आल्याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. तेव्हा जनसुरक्षा कायद्यातील तरतुदी कठोर करू नका, नाही तर तुम्हालाही त्याच मार्गाने जावे लागेल, असा सल्ला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना उद्देशून दिला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्तेत कोणी कायम नसते हे मान्य केले. राजकीय कारकिर्दीत आमचा जास्त काळ विरोधी पक्षात गेला. तसेच विरोधक किंवा विरोधी पक्षनेता म्हणून मी किती ‘खतरनाक’ होतो हे तुम्ही अनुभवले आहे, हे फडणवीस यांनी सांगताच सभागृहाने दाद दिली.

तात्या’ला घोर

गणातात्याला गेल्या दोन-अडीच वरसापासनं झेडपीचा, न्हाय जमल तर पंचायत समितीचा मेंबर हुयाचं सपान पडत हुतं. मतदार संघाची रचना जाहीर होतांना आपली गल्ली, आपली भावकी आणि आपल गाव आपल्याला सलप असलं तरच मेंबर व्हायचं सपान खरं हुणार हाय. मात्र सोमवारी कच्चा आराखडा जाहीर झाला, त्यात गाव हुतं, पर हक्काची मतं असल्याली वाडी, वस्ती दुसऱ्या गटात गेल्यानं सगळ हुत्याच नव्हतं हुण्याची येळ आल्या. आता पुन्हा आरक्षणाच काय हुतयं याचाही घोर लागलाय. दमणूक करणारं, तोंडाला फेस आणणारं गाव गटात असल्यानं ‘सासूच वाटणीला आल्या’ची सल मनात ठेवूनच आता आरक्षण काय हुतयं याचा तात्याला घोर लागलाय.