कुणाचे कौतुक करायचे असेल तर, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पुष्पगुच्छ देण्याऐवजी एक चॉकलेट देऊन तोड गोड करतात. मार्च महिन्यात जिल्ह्यातील विविध विभागांनी दिलेले लक्ष्य पार पाडल्याबद्दल मात्र त्यांनी शहरातील उच्चभ्रूसाठीचे समजल्या जाणाऱ्या ‘ऑफिसर्स क्लब’मध्ये मेजवानी देऊन त्यांचे कौतुक केले. आता एखाद्याकडून काम करून घ्यायचे म्हटले की, त्याचे कौतुक झाले तर अंगी दहा हत्तीचे बळ येते. हे मान्य पण, पत्रकार बैठकीत स्वच्छतेचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतल्याने लोकांनाही स्वच्छतेची सवय लागल्याचे सांगितले. उदाहरण देताना दादा म्हणाले, एखाद्या मुलाला चॉकेलट दिले तर वेष्टनाचा कागद खाली न टाकता खिशात टाकतो. जर खाली टाकला तर मोदीकाका रागावातील याचे भय. चॉकलेटवाल्या दादांना मोदी काकांचे भय तर नाही ना एक भाबडी शंका !
शिक्षणमंत्री राज्याचे की मालेगावचे ?
नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची पहिली घंटा सोमवारी वाजली. याआधी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत विविध योजनांसह प्रवेशोत्सवाचाही आढावा घेतला होता. बैठक जिल्ह्याची होती. परंतु, शिक्षण मंत्र्यांना चिंता केवळ आपल्या मालेगाव तालुक्याची लागली होती. विविध मुद्यांवरून त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत सूचना केल्या. हे सर्व अधिक्याने मालेगाव केंद्रितच होते. उपस्थितांनाही त्यामुळे दादा भुसे राज्याचे शिक्षणमंत्री आहेत की केवळ मालेगावचे, असा प्रश्न पडतो.
यावर काय बोलावे?
केंद्रातील भाजप सरकारने ११ वर्षे पूर्ण केले आहेत. सरकारच्या कामगिरीतील यशस्वी पैलू लोकांसमोर आणण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. राज्या राज्यातील मंत्री, खासदार यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे. सरकारच्या कामगिरीचे गुणगान केले जात असताना अडचणीत येणाऱ्या मुद्द्याला सामोरे जाताना अनेकदा पेच निर्माण होतो. कोल्हापुरात याचा अनुभव आला. पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंदूर मोहीम उघडून पाकिस्तानला धडा शिकवला. यामुळे भारताची जगात प्रतिमा उजळली आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून वारंवार केला जात आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न चुकता दिले जाते. युक्रेन – रशिया युद्ध थांबवण्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला होता. तर भारत -पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण त्यावर सत्ताधाऱ्यांकडून ठोस प्रतिक्रिया का आली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर खासदार धनंजय महाडिक यांनाही यावर आता काय बोलायचे ? रशिया – युक्रेन युद्ध हा आपल्यापासून दूरचा मुद्दा आहे असे सांगत हात झटकले.
(संकलन : चारुशीला कुलकर्णी, दिगंबर शिंदे, दयानंद लिपारे )