मुंबई : माढामधून ‘मविआ’चा उमेदवार कोण, याची उत्सुकता ताणली आहे. मोहिते पाटील भाजपविरोधात शड्डू ठोकणार की त्यांचे बंड पेल्यातले वादळ ठरणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ‘तुतारी’ यावेळी हाती घ्यायची आणि नाईक -निंबाळकर घराण्याला चितपट करायचेच, असा धैर्यशील मोहिते पाटील यांनी ‘पण’ केल्याचे सूत्रांकडून समजते.

राष्ट्रवादीत असताना अजित पवार यांचा जाच असह्य झाल्याने अन कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना गुंडाळल्याने मोहिते पाटील घराण्याने घड्याळाची साथ सोडली. भाजपवासी झाले. त्याबदल्यात विजयसिंह यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषद लाभली. मोहिते पाटील यांच्या सहकार्याने भाजपला माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा सहज जिंकता आली.

हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

माढाचे भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पाच वर्षांत मोहिते पाटील यांना कायम कॉर्नर केले. इतकेच नाही तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे स्वप्न असलेली कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना अस्तित्वात आणताना तिचे चक्क नाव बदलून टाकले. मोहिते पाटील यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तेथे बीडमधून राम सातपुते यांना भाजपने पाठवले. त्यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचाच कित्ता गिरवत, मोहिते पाटील यांना डावलून पाच वर्षे मतदारसंघात कारभार केला.

विजयसिंह यांचे पुत्र रणजितसिंह भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत. कुटुंबीयांत त्यांचा एकट्याचा या बंडाला विरोध आहे. त्यामुळे ‘आमचा निर्णय होईपर्यंत रणजितसिंह यांनी शिवरत्न बंगल्यावर येऊ नये’ असे कुटुंबियांकडून सांगण्यात आलेले आहे.

हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी पक्षासोबत

यासंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मी पक्षासोबत आहे. भाजप सांगेल त्याचा मी प्रचार केला आहे. आजही तीच माझी भूमिका आहे. पण, माझ्या कुटुंबियांची भूमिका वेगळी असू शकते. त्याला माझा नाईलाज आहे.