Bihar Assembly Elections 2025 RJD-Congress Seat Sharing : बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला वेग दिला आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. सध्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस या महाआघाडीतील दोन घटकपक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीची राज्यात मोठी ताकद असल्याने त्यांनी यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा सोडण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला गेल्या वेळच्या दिलेल्या जागांच्या तुलनेत कमी दिल्या जाणार आहे. आरजेडीच्या भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढवणार?

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. या सर्वच जागांवर महाआघाडीने उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्यातील सुमारे ५८ जागा काँग्रेसला सोडल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली. विशेष बाब म्हणजे या ५८ पैकी २५ जागांसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी तयार केली आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागांवर उमेदवार उभे केले होते, त्या तुलनेत यंदा काँग्रेसला १२ जागा कमी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने उमेदवारी निश्चित केलेल्या २५ जणांमध्ये विद्यमान १५ आमदारांचा समावेश आहे. उर्वरित दोन विद्यमान आमदारांची नावे प्रलंबित ठेवण्यात आली आहे. या दोन्ही जागांवर पक्ष नवीन उमेदवार देऊ शकतो किंवा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलासोबत जागांची अदलाबदल करू शकतो, असे सूत्रांनी सांगितले आहे.

काँग्रेसकडून २५ उमेदवारांची नावे निश्चित

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या, परंतु त्यांना केवळ १९ जागांवर विजय मिळवता आला. या १९ पैकी काँग्रेसचे दोन आमदार— मुरारी प्रसाद गौतम (चेनारी मतदारसंघ) आणि सिद्धार्थ सौरव (विक्रम मतदारसंघ)— यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी केली होती. आगामी निवडणुकीत हे दोन्ही नेते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ज्या २५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत, त्यात अनेक प्रमुख नेत्यांच्या मुलांचा समावेश असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे.

आणखी वाचा : Rajen Gohain Resignation : भाजपाला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्यासह १७ जणांचा तडकाफडकी राजीनामा; काँग्रेसला बळ मिळणार?

काँग्रेसकडून कोणकोणत्या नेत्यांना उमेदवारी?

काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्यांमध्ये बिहार काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांचे पुत्र आकाश कुमार यांचा समावेश आहे. त्याशिवाय बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख राजेश कुमार यांच्या एका नातेवाईकालादेखील उमेदवारी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, विश्वनाथ राम (राजपूर मतदारसंघ), मुन्ना तिवारी (बक्सर मतदारसंघ), अजित शर्मा (भागलपूर मतदारसंघ), विजेंद्र चौधरी (मुझफ्फरपूर मतदारसंघ), अजय सिंह (जमालपूर मतदारसंघ), छत्रपती यादव (खगरिया मतदारसंघ), आनंद शंकर सिंह (औरंगाबाद मतदारसंघ), मनोहर प्रसाद (मनिहारी मतदारसंघ), संतोश मिश्रा (कराहगर मतदारसंघ), अबिदूर रहमान (अररिया मतदारसंघ), शकील अहमद खान (कदवा मतदारसंघ), मोहम्मद अफक आलम (कसबा मतदारसंघ), इझारुल हुसैन (किशनगंज मतदारसंघ) आणि नीतू कुमारी (हिसुआ मतदारसंघ) या विद्यमान आमदारांची नावे उमेदवारी यादीत आहेत.

काँग्रेसकडून पराभूत उमेदवारांनाही संधी

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांना काँग्रेसकडून पुन्हा तिकीट दिले जाणार आहे. त्यामध्ये आकाश कुमार (कुर्था मतदारसंघ), गजानन शाही (बरबीघा मतदारसंघ), मंतन सिंह (वारसलीगंज मतदारसंघ), अनिल सिंह (हरनौत मतदारसंघ), पूनम पासवान (कोढा मतदारसंघ), अमित कुमार टुन्ना (रीगा मतदारसंघ) आणि बंटी चौधरी (सिकंदरा मतदारसंघ) यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या महाआघाडीने भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कडवी झुंज दिली होती. त्यावेळी महाआघाडीने २४३ पैकी ११० जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना ३७.२३% मते मिळाली होती. विशेष म्हणजे महाआघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मतांमध्ये केवळ ०.०३% टक्क्यांचा फरक होता.

हेही वाचा : भाजपाच्या ‘मिशन बिहार’ला निवडणुकीपूर्वीच धक्का? दोन मित्रपक्ष साथ सोडणार असल्याची चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण!

२०२० मध्ये काँग्रेसला बसला होता फटका

राष्ट्रीय जनता दल पक्षाने गेल्या निवडणुकीत चमकदार कामगिरी करत १४४ जागांपैकी तब्बल ७५ जागांवर विजय मिळवला होता आणि त्यांच्या मतांची टक्केवारी २३.११% इतकी होती, तर महाआघाडीतील डाव्या पक्षांनी ४.६४% मतांसह १६ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला मात्र ७० पैकी केवळ १७ जागांवरच विजय मिळवता आला होता. त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ९.४८% होती. दरम्यान, गेल्या निवडणुकीत काँग्रेसला समाधानकारक कामगिरी करता न आल्यानेच राज्यात महाआघाडीला सत्तास्थापन करण्यात अपयश आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला कमी जागा देण्यात याव्यात असे महाआघाडीतील काही नेत्यांचे मत आहे.