गोंदिया : नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे २४ तास केवळ संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असतात. हा हल्ला ते समोरून नव्हे तर बंद दारातून करतात. मोदी म्हणतात, आमच्याकडचे संविधान लाल रंगाचा आहे. मग त्यांनी सांगावे, या संविधानात फुले, आंबेडकर, भगवान बुद्ध यांचे विचार नाहीत का? माझ्या मते मोदींना संविधानाची जाणच नाही, त्यांनी संविधानाचे वाचनच केले नाही. वाचन केले असते तर संविधानाचे महत्त्व त्यांना कळले असते, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

मंगळवारी गोंदिया येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. मोदींनी देशात तीन काळे कृषी कायदे आणले होते. त्याविरोधात संपूर्ण देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले तरीदेखील मोदी म्हणतात हे कायदे शेतकरी हिताचे आहेत. हे सरकार अंबानी आणि अदानीचे असल्याची टीकाही राहुल यांनी या वेळी केली.

हेही वाचा >>> फसवेगिरीत भुजबळांनी सर्व मर्यादा ओलांडल्या; नाशिकमधील प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका

विमानातील बिघाडामुळे चिखलीतील सभा रद्द

बुलढाणा : विमानातील तांत्रिक बिघाडामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जिल्ह्यातील चिखली येथील प्रचार सभा रद्द करण्यात आली. मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांची चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित होती. मात्र, त्यांना घेऊन येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे ते चिखलीत येऊ शकले नाहीत. त्यांनी स्वत: चित्रफीत प्रसारित करून याबद्दल जनतेची माफी मागितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी, रेवंत रेड्डी यांच्या सभा

मुंबई : राहुल गांधी १४ नोव्हेंबर रोजी नंदूरबार आणि नांदेड येथे, तर १६ नोव्हेंबर रोजी अकोला आणि चिमूर येथे ते सभा घेणार आहेत. याआधी राहुल यांनी नागपूर, मुंबई आणि गोंदिया येथे प्रचारसभा घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हेही बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, सायंकाळी ४ वाजता ते वरळी विधानसभेत प्रचारसभा घेणार आहेत. धारावी मतदारसंघात सायंकाळी ६.३० वाजता ते धारावी मतदारसंघात रोड शो घेणार आहेत.