मुंबईः राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मधुजाल (हनीट्रॅप) मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी गुरुवारी विधानसभेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई, ठाणे आणि नाशिक मधुजालाचे केंद्र असून याबाबतचा पेनड्राईव्ह सार्वजनिक करण्याचा इशारा देत याबाबत सरकारने खुलासा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त विरोधकांनी सरकार विरोधात घोषणा देत सभात्याग केला. या प्रकरणात अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या मधुजाल प्रकरणाचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळात उमटले. मधुजालाच्या माध्यमातून राज्यातले गोपनीय दस्तऐवज काही लोकांना मिळत आहेत. या प्रकरणात राज्यातील काही मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा विधिमंडळ आवारात रंगली असतानाच काँग्रेसचे नाना पटोले यांनी काल ही बाब सभागृहात उपस्थित करीत चौकशीची मागणी केली होती. राज्यातील गोपनीय दस्तऐवज बाहेर जातील असा मधुजाल टाकला जात आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या मधुजालाच्या माध्यमातून गोपनीय कागद समाजविघातक संघटनांकडे गेले तर राज्यासह संपूर्ण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका असल्याचे सांगत पटोले यांनी सरकारकडे खुलासा करण्याची मागणी केली. मात्र त्यावर सरकारने कोणचाच खुलासा केला नव्हता.
विरोधकांनी मधुजालाचा मुद्दा उपस्थित करीत चौकशीची मागणी केली. नाना पटोले यांनी मधुजालाबाबत अनेक पुराव्यांचा पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचा दावा करून सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. मधुजालाचे मुख्य केंद्र मुंबई, ठाणे, नाशिक असून यात काही मंत्री आणि वरिष्ठ सनदी अधिकारी अडकले आहेत. आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही. चारित्र्य हनन करायचे नाही. पण सरकार प्रकरण लपवत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.