मुंबई : शिवडी मतदारसंघात शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाराज झालेल्या सुधीर साळवी यांची अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समजूत काढण्यात यश आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आपण कायम पक्षाबरोबर असून पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले.

शिवडी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले विद्यामान आमदार अजय चौधरी यांना निष्ठावंतांना डावलणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी दिली. चौधरींची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधीर साळवी हे तडकाफडकी ‘मातोश्री’हून निघाले होते. त्यांनी आपली नाराजी दुसऱ्या दिवशी समाजमाध्यमावर प्रगट केली होती. ‘निष्ठावंत’ हा शब्द अधोरेखित करीत त्यांनी ‘माझ्या प्रिय, शिवडी विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिकांनो, मला तुमच्याशी बोलायचे आहे,’ असा मजकूर समाजमाध्यमावर प्रसिद्ध करीत लालबाग बाजारामध्ये मेळावा घेण्याचे संकेत दिले. यामुळे साळवी बंडखोरी करणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती.

हेही वाचा >>> ओबीसीबहुल जागांच्या वाटपावर राहुल यांची नाराजी; केंद्रीय निवड समितीची बैठक; चर्चेत कमी पडल्याबद्दल राज्यातील काँग्रेस नेत्यांची कानउघाडणी

त्यानुसार लालबाग बाजारामध्ये साळवी समर्थकांची गर्दी जमली असतानाच उद्धव ठाकरे यांनी त्यांना ‘मातोश्री’वर बोलावून घेतले. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर व माजी नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते. २० मिनिटे उद्धव ठाकरे यांनी साळवी यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. तर आमदार अजय चौधरी यांनीही आपल्यात कोणतेही मतभेद नाहीत. आपली साळवी यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही सहकार्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षनिष्ठा महत्त्वाची : साळवी

बैठकीनंतर पुन्हा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुधीर साळवी यांनी आपल्याला निराश करणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याचे सांगितले. तुमच्या मनातील आमदार असलो तरी ‘पक्षनिष्ठा’ महत्त्वाची आहे. त्यामुळे यापुढेही आपण पक्षाबरोबर काम करीत राहणार आहोत, असे सुधीर साळवी यांनी सांगितले.