प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीने जागावाटपासाठी ठेवलेल्या अटी लक्षात घेता समझोता होण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक आहेत. आंबेडकर स्वतंत्र लढल्यास किती नुकसान होऊ शकते याचा अंदाज महाविकास आघाडीकडून घेतला जात आहे.
वंचितच्या महाविकास आघाडीतील सहभागाबाबत आधीपासूनच साशंकता होती. शिवसेना ठाकरे गट आणि वंचितमध्ये एकत्र लढण्यावर समझोता झाला असला तरी वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आधीपासूनच आक्षेप होता. भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आणि गेल्या वेळी वंचितच्या मतविभाजनाचा बसलेला फटका यामुळे आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबरोबर यावे यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.
हेही वाचा : विद्यापीठांच्या मुद्द्यावरून नितीश सरकार आणि राज्यपाल आमने-सामने; ‘या’ वादाला कारणीभूत कोण?
महाविकास आघाडीत वंचितने २७ जागांवर आम्ही लढण्याची तयारी केल्याचे पत्र दिले आहे. प्रत्यक्ष किती जागा पाहिजेत याची मागणी केलेली नसली तरी २७ जागांचा प्रस्ताव देऊन फक्त दोन-तीन जागा स्वीकारणार नाही हा सूचक संदेश दिला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आधीच जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. वंचितला दोन किंवा तीन जागा सोडण्याची तिन्ही पक्षांची तयारी आहे. अशा परिस्थितीत वंचितची जागांची मागणी वाढल्यास तिन्ही पक्षांचे गणित बिघडू शकते.
हेही वाचा : बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
ओबीसी मतांची भीती
जालन्यातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी आंबेडकर यांची एक अट आहे. जरांगे यांना पाठिंबा दिल्यास राज्यात अन्यत्र ओबीसी मते गमविण्याची भीती आहे. कारण जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाता मराठा समाजाला वाटेकरी करण्याची मागणी केल्याने ओबीसी समाजात जरांगे पाटील यांच्याबद्दल संतप्त भावना आहे. जरांगे यांना बरोबर घेतल्यास ओबीसी मते एकगठ्ठा महायुतीकडे जाण्याची भीती आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेसला यशाची अपेक्षा असताना या जागेवर डॉ. अभिजीत वैद्य यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी वंचितने केली आहे. महाविकास आघाडीने १५ उमेदवार ओबीसी समाजाचे तर तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे उभे करावेत, अशा विविध मागण्या केल्या आहेत. अल्पसंख्याक उमेदवार उभे केल्यास मतांचे ध्रुवीकरण होते. यामुळे भाजप-शिंदे गटाला मतांच्या ध्रुवीकरणाला संधीच मिळेल, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा
प्रकाश आंबेडकर यांच्या एकूणच भूमिकेविषयी आधीपासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांना संशय होता. म्हणूनच त्यांनी अनेकदा मागणी करूनही आंबेडकर यांचा प्रवेश लांबणीवर पडला होता. महाविकास आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यात आले तेव्हा आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष नाही, अशी भूमिका आंबेडकर यांनी स्पष्ट केली. २०१९ मध्ये वंचितच्या मतविभाजनाचा महाविकास आघाडीला फटका बसला होता. हे टाळण्यासाठीच वंचितला बरोबर घेण्याची भूमिका होती. पण वंचितच्या अटी लक्षात घेता महाविकास आघाडी आणि वंचितमघ्ये समझोता होण्याबाबत साशंकातच व्यक्त केली जाते.