पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. ताकदीने काम केले नसल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. ज्यांनी काम केले नाही, त्यांची नावे पवार यांच्याकडे दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे निकालापूर्वीच मावळात महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

महायुतीचे उमेदवार बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे मावळच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाघेरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. जुन्या सहका-यांनी त्यांचे काम केल्याचे बोलले जात होते. त्यातच महायुतीचे उमेदवार बारणे यांनीच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काम केले नसल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा >>> हिंदू-मुस्लीम आणि काँग्रेसवर टीका! आतापर्यंत कोणत्या मुद्द्यावर कितीदा बोलले मोदी?

बारणे म्हणाले की, मावळमध्ये महायुतीची ताकद आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मावळात कोठेही ताकद नाही. शेकापची उरण, पनवेलला ताकद आहे. महायुतीच्या सर्व आमदारांनी काम केले. अजित पवार यांनी मावळमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यांच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काम केले. पण, काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. नेत्यांचे आदेश मानले नाहीत. ज्यांनी काम केले नाही, त्यांची यादी पवार यांना दिली आहे. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, पार्थ पवार यांनीही निवडणुकीत व्यक्तिगत आरोप केले नव्हते. पण, विकासात्मकदृष्टी नसल्याने वाघेरे यांनी व्यक्तिगत आरोप केले.

हेही वाचा >>> प्रज्वल रेवण्णाप्रकरणी जेडीएसमधील महिला नेत्या का गप्प?

दरम्यान, दोन लाख ५० हजार ३७४ मतांनी विजयी होईल, असा दावाही बारणे यांनी केला. तर, वाघेरे यांनी एक लाख ७२ हजार ७०४ मतांनी विजयाचा दावा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आढळरावांना ‘धनुष्यबाण’ मिळाले असते

शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढविलेले शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी थोडे थांबायला हवे होते. ते थोडे थांबले असते, तर त्यांना धनुष्यबाणाची उमेदवारी मिळाली असती, असा दावाही खासदार बारणे यांनी केला.