विश्वास पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई : कोरेगावचे आमदार महेश संभाजीराव शिंदे खटाव (ता. खटाव, जि. सातारा) ते एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले आहेत. त्यांचे वडील रयत शिक्षण संस्थेत प्राचार्य तर आई प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यांचे शिक्षण बी.फार्म आहे .त्यांच्याकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. २०१९ची विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढविली.त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. आमदार महेश शिंदे हे शिंदे गटात आहेत.

हेही वाचा… अमित सामंत : वचनपूर्तीसाठी धडपड

४८ वर्षीय शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात खटाव जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून सन २००७ ते २०१२ या कालावधीत झाली. या कालावधीपासून त्यांनी कोरेगाव खटाव मतदारसंघ बांधणीला सुरुवात केली.युवकांचे, गावोगावच्या ज्येष्ठांचे संघटन केले. युवकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या, व्यायामशाळा उभारल्या.स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना बळ दिले. नव्याने राजकीय घडी बसवायची आहे असे मनोमन समजून जनसंपर्क कायम वाढवला.गावोगावची अडलेली कामे समजून घेतली. रोजगार मेळावे भरविले.त्यातून तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या.मतदारसंघातील कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून नगर विकासचे नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले. त्या भागातील बाजारपेठेचं एक वेगळं छोटंसं शहर कोरेगाव उभारण्याचा प्रयत्न केला. या कामात त्यांना त्यांची डॉक्टर बहीण व पत्नीचे सहकार्य लाभले. ते २०१४ पूर्वीपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आले.त्यांनी मतदारसंघ बांधणीत भाजपच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नियमित संपर्कात असतात. २०१९च्या निवडणुकीत मतदारसंघ विभागणीत शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ आल्याने भाजपचा त्याग करून शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविली आणि जिंकलीही. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले.

हेही वाचा… विक्रांत गोजमगुंडे : ध्येयनिष्ठ, कार्यप्रवण

महेश शिंदे मूळ व्यावसायिक व उद्योजक आहेत. इथेनॉल, अल्कोहोल, साखर, शेती उद्योगात त्यांची मोठी गुंतवणूक आहे. मतदारसंघात मोठा जनसंपर्क, कामाचा वेगवान धडाका आणि आक्रमक नेता अशी आमदार महेश शिंदे यांची ओळख झाली आहे. रात्री-अपरात्रीही मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी ते बाहेर असतात. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून गरजू रुग्णास तात्काळ अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले. आजही ते सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध होत असतात. त्यांच्याकडे परखडपणा आहे. मतदारसंघात मागील तीन वर्षांत ९०० कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावल्याचा त्यांचा दावा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh shinde foresight in development works print politics news asj
First published on: 21-11-2022 at 09:49 IST