Manoj Jarange Patil Azad Maidan Protest : मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शुक्रवारपासून (तारीख २९ ऑगस्ट) जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्यापाठोपाठ राज्यभरातील असंख्य मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय तसूभरही मागे हटणार नाही, असा चंगच मराठा बांधवांनी बांधला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत महायुती सरकारची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, या आंदोलनाला काही राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दिला असून त्यांनी जरांगेंची भेट घेतली आहे, त्यामध्ये कोणकोणत्या नेत्यांचा समावेश आहे? त्याबाबत जाणून घेऊ…
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी सुरुवातीला फक्त एका दिवसाची (२९ ऑगस्ट) परवानगी देण्यात आली होती. याशिवाय आझाद मैदानावर फक्त पाच हजार आंदोलकांनाच येण्याची अट घालून देण्यात आली. मात्र, तरीही मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी आझाद मैदानावर कूच केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. शुक्रवारी राज्य सरकारने जरांगे यांच्या आंदोलनासाठी एक दिवसाची मुदतवाढ दिली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आझाद मैदानावर सुमारे १५०० ते २००० पोलिसांना बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेतली. त्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्यात आम्हीही तुमच्यासोबत आहोत असे आश्वासन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी जरांगे पाटील यांना दिलं.

आमदार विजयसिंह पंडित जरांगेंच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली. आमदार पंडित यांनी याआधीच मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. “मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे. सरकार शिष्टमंडळ सुद्धा आझाद मैदानावर येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे, असं आमदार विजयसिंह पंडित यांनी माध्यमांना सांगितलं.

आमदार अभिजीत पाटील यांनी घेतली जरांगेंची भेट
सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनीही शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आझाद मैदानावर जमा झालेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला. अभिजित पाटील हे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत. मराठा आरक्षणाबाबत आपण सरकारशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिलं.

आमदार संदीप क्षीरसागर व प्रकाश सोळंके जरांगेंच्या भेटीला
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर उपोषण सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. राज्य सरकारने आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, असं विधान यावेळी क्षीरसागर यांनी केलं. दुसरीकडे आमदार सोळंके यांनीही जरांगेंची भेट घेऊन मराठा बांधवांबरोबर चर्चा केली.

खासदार बजरंग सोनवणे यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शुक्रवारी त्यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगेंबरोबर चर्चा केली. याआधी खासदार सोनवणे यांनी मराठा आरक्षणाबाबत लोकसभेतही आवाज उठवला होता.

आमदार सुरेश धस व राजेश विटेकर यांनी घेतली जरांगेंची भेट
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन यावेळी धस यांनी जरांगेंना दिलं. परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर पंढरपूरचे भाजपा आमदार समाधान आवताडे यांनीही मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केल्यानं भाजपाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या लढाईतून स्वत:ला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटातील आमदार, खासदार व इतर नेत्यांना मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बोलू नका, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मराठा आंदोलकांशी सरकारने चर्चा करावी, अशी जाहीर भूमिका शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी मांडली आहे.
एक वरिष्ठ भाजप नेत्यानं सांगितलं, “अशा परिस्थितीत महायुतीने एकत्रितपणे जरांगे पाटील यांना सामोरं जायला हवं. पण महायुतीतले मतभेद आता उघड दिसू लागले आहेत. प्रत्येकजण या संधीचा उपयोग आपले राजकारण पुढे नेण्यासाठी करत आहे. एकनाथ शिंदे यांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन आपले मराठा नेतृत्व सिद्ध करायचे आहे, हे लपून राहिलेले नाही. जर मराठा मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तर तेच आघाडीवर असतील, अशी त्यांना अजूनही आशा आहे.” दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत आज (शनिवारी) संपत आहे. त्यामुळे ते आंदोलन सुरूच ठेवणार की स्थगित करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.