मेघालय विधानसभेच्या निवडणुकांनंतरचे पहिले अधिवेशन आज संपत आहे. तरीही शेवटच्या दिवसापर्यंत विधानसभेत कोणत्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होणार? यावर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी सत्ताधारी पक्षांवर टीका करण्यासोबतच एकमेकांविरोधातही यथेच्छ टीकाटिप्पणी केली होती. आता विधानसभेचे अध्यक्ष थॉमस ए. संगमा यांना पत्र लिहून दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे मेघालय विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा पेच निर्माण झाला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मेघालय विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळता त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. ६० जागा असलेल्या विधानसभेत मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षाला सर्वाधिक २६ जागा मिळाल्या. निकालानंतर काहीच दिवसांत भाजपा आणि इतर प्रादेशिक पक्षांनी एनपीपीला पाठिंबा देऊ केला. युनायटेड डेमॉक्रेटिक पक्षाला (UDP) ११ जागा मिळाल्यामुळे तो राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला होता. सुरुवातीला विरोधी पक्षात बसण्याची वल्गना केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी अनपेक्षितपणे एनपीपीला पाठिंबा दिला.

विरोधी पक्षाच्या निवडीबाबत मेघालय विधानसभेचे सचिव अँड्रू सिमोन्स म्हणाले की, अंतिम निर्णय लोकसभेचे अध्यक्षच घेतील. दोन्ही पक्षांनी या पदावर दावा केल्यामुळे निर्णय घेण्यास थोडा उशीर होतोय, पण लवकरच निर्णय घेतला जाईल. दोन्ही पक्षांना समान जागा मिळाल्यामुळे अध्यक्ष ज्येष्ठता पाहून निर्णय घेतील.

दुसरा मार्ग असा की, दोन्ही पक्षांनी आपापसात संवाद साधून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. मात्र दोन्ही पक्षांनी समन्वय साधून निर्णय घेण्यास विरोध दर्शविला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते रॉनी लिंगडोह म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि तृणमूल काँग्रेस एकत्र नाही. जर ते आमच्यापर्यंत आले असते तर तसा प्रस्ताव आम्ही पक्षश्रेष्ठींकडे पाठविला असता. पण त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृणमूल काँग्रेस पक्षाचे मेघालय उपाध्यक्ष जेम्स लिंगडोह यांनीदेखील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविला असल्याचे सांगितले. आमच्या अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांना आधीच याबाबत पत्र लिहिलेले आहे. आम्ही पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ. मेघालयमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘व्हॉईस ऑफ द पीपल्स’ पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत. स्थानिक जाणकार सांगतात की, व्हॉईस ऑफ द पीपल्स पार्टी काँग्रेस किंवा टीएमसीसोबत जाण्यास तयार नाही. त्यांनी कोणत्याही पक्षाशी हात मिळवला नसल्यामुळे केवळ ६० जागा असणाऱ्या मेघालय विधानसभेत अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.