रत्नागिरी  : कोकणात शिवसेना की भाजपा पक्ष मोठा यावरुन आता सत्ताधारी पक्षांच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. कोकणातील हे दोन्ही मंत्री आपलाच पक्ष मोठा असल्याचे दावा करु लागल्याने राजकारण  तापू लागले आहे.
राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये असलेली कुरघोडी नवी नाही. मात्र आता कोकणात कोणता पक्ष मोठा यावरुन वादाची ठिणगी पडली आहे. आधीच कोकणात भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात अंतर्गत वाद सुरु असताना, या नवीन वादाला तोंड फुटले आहे.
सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री  व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात शिवसेनाच मोठा पक्ष असल्याचे जाहीर केले.  आधीच मंत्री भरत गोगावले यांनी खासदार नारायण राणे यांच्या विरोधात वक्तव्ये करुन  रोष ओढावून घेतला होता. एका जाहीर सभेत मंत्री भरत गोगावले यांनी आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत खासदार नारायण राणे यांच्या कारनामांचा पाढाच वाचला होता.

यावरुन भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्ती करुन या वादावर पडदा टाकला होता. मात्र या विषयाची धुसफुस आज ही कायम असल्याचे दिसत आहे. यात स्वत:च रत्नागिरीचे पालकमंत्री  उदय सामंत यांनी आगीत तेल ओतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले की, कोकणातील तिन्ही जिल्ह्यात शिवसेनाच पक्ष मोठा आहे. या त्यांच्या वक्तव्याने भाजपला डिवचण्याचे काम केले आहे. यावरुन राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर पलटवार करत येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पक्षाने स्वत:च्या हिंमतीवर लढून दाखवाव्यात असे, आव्हान केले आहे.

राज्यात व देशात भाजपाच सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगून मंत्री नीतेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटाला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले आहे. कोकणातील मोठा पक्ष शिवसेनाच असल्याचा मंत्री उदय सामंत यांचा दावा खोडण्याचे काम मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे.

कोकणात पक्षीय बळामध्ये रायगड जिल्ह्यात  शिवसेनेचे  ३,  भाजपाचे ३,  राष्ट्रवादी काँग्रेसचे १ आमदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे १, शिवसेना शिंदे गटाचे ३ व राष्ट्रवादी काँग्रेस १ असे आमदार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे २ व भाजपचा एक आमदार आहेत. कोकणातील या तिन्ही जिल्ह्यात ८ आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. राष्ट्रवादीचे  २  आमदार आहेत. तसेच  भाजपचे ४ आमदार, ठाकरे गटाचे १ आमदार आहेत. 

कोकणात वर्चस्वासाठी या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांमध्ये आता चांगलीच जुंपली आहे. या वादावर आक्रमक झालेल्या नीतेश राणे यांच्या विरोधात मौन बाळगणेच मंत्री उदय सामंत यांनी पसंत केले आहे. मात्र आजही उद्योगमंत्री उदय सामंत यावर काय प्रतित्तर देणार? याची उत्सुकता कोकणातील जनतेला व राजकीय कार्यकर्त्यांना लागुन राहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री नीतेश राणे व  उदय सामंत यांच्यात कोणतेच वाद नाहीत. कोकणात शिवसेनेचे जास्त आमदार आहेत. हे खरे असले तरी भाजप आमचा मित्र पक्ष आहे. – राहूल पंडीत, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदेगट)