आसाराम लोमटे

परभणी: आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार अशी ग्वाही दिल्यानंतरही एक-एक आमदार सोडून जात असताना परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील हे मात्र अविचल राहिले. ‘मातोश्री’शी असलेली निष्ठा त्यांनी जराही ढळू दिली नाही म्हणूनच परभणीत शिवसेना अभेद्य राहिली. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. वडील डॉ. वेदप्रकाश पाटील हे कृषी क्षेत्रातील प्राध्यापक, निवृत्त कुलगुरू; त्यामुळे स्वाभाविकच शिक्षण क्षेत्रातच काम करायचे असे राहुल पाटील यांनी ठरवले.

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९९८ साली ‘एमबीबीएस’ झाल्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्याआधी महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व त्यांनी केलेलेच होते. २०१२ साली युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आल्यानंतर जणू पुढची राजकीय दिशाच निश्चित झाली. परभणी विधानसभेची उमेदवारी मिळण्यापूर्वी युवासेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख म्हणून राहुल पाटील यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. आजही ते युवा सेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. जोडीला शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे आहे. परभणी विधानसभेची उमेदवारी २०१४ मध्ये मिळाल्यानंतर थेट राजकीय जीवनात त्यांचा प्रवेश झाला.

हेही वाचा… प्रवीण दटके : निष्ठावंत कार्यकर्ताहेही वाचा :

२०१९ साली ते दुसऱ्यांदा आमदार झाले. केवळ भावनेचे राजकारण करण्यापेक्षा विधायक आणि रचनात्मक कार्याच्या माध्यमातून मतदारसंघाची बांधणी केली पाहिजे याकडे आमदार पाटील यांचा कटाक्ष आहे. ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य शिबिरा’च्या माध्यमातून आजवर असंख्य गोरगरीब रुग्णांच्या दुर्धर आजाराचे निदान व उपचार करण्याचे काम करण्यात आले आहे. शैक्षणिकदृष्ट्या मोठा अनुशेष असलेल्या परभणीत आज त्यांच्या प्रयत्नाने एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ते सुरू होईल. परभणीत कापसाचे विक्रमी उत्पादन होते याचा विचार करून ‘जय भवानी महिला सहकारी सूतगिरणी’चे काम सुरू आहे. तब्बल अडीचशे महिला बचत गट आमदार पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहेत आणि त्यातूनच ‘परभणी महिला बचत गट स्वावलंबन पतसंस्था’ आकाराला आली आहे.

हेही वाचा… अमित सामंत : वचनपूर्तीसाठी धडपड

औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अलीकडे बेरोजगार तरुणांचे मिळावे घेऊन त्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू केले आहे, यातूनच नजीकच्या काळात २०० तरुण जपानला पाठवले जाणार आहेत. राज्यभरातील विविध ३३ अपंग जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा त्यांनी घडवून आणला, याची ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. आमदार पाटील यांच्या संकल्पनेतून ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा, परित्यक्ता स्वावलंबन संकल्प’ योजनेच्या माध्यमातून दोन प्रशिक्षण केंद्रांवर महिलांना शिवणयंत्र प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित झालेल्या महिलांना पाच हजार शिवण यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यातील सहाशे शिवणयंत्रांचे नुकतेच वाटप झाले आहे. आमदार पाटील यांच्या पुढाकाराने काही महत्त्वपूर्ण बाबींचा पाठपुरावा झाला आहे.

हेही वाचा… महेश शिंदे : विकासकामांची दूरदृष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र परभणीत सुरू झाले आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ उपकेंद्र सुरू झाले आहे, अल्पसंख्याक तंत्रनिकेतन प्रस्तावित आहे. परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात पाच एकर जागेवर विज्ञान संकुल उभे राहत आहे. संकुलासाठी लागणाऱ्या निधीचा प्रश्न आमदार राहुल पाटील यांच्या पुढाकारातून सोडविण्यात आला.