सांगली : इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून नामांतराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने करताच या निर्णयाचे इस्लामपूर शहरात तातडीने स्वागत केले असले तरी पुन्हा “उरूण ईश्वरपूर “असे नामकरण करावे अशी मागणी करीत स्थानिक आमदार जयंत पाटील यांनी केल्याने वादाची ठिणगी पडली आहे.
नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेताना लोकप्रतिनिधी या नात्याने मला विश्वासात घेतले नसल्याची नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकभावना लक्षात घेउन नामांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले. आता चेंडू केंद्र सरकारकडे असल्याने दिल्लीच्या मंजुरीनंतर नामांतर होणार आहे. यानंतर आता जिल्ह्यातील खानापूर, सुलतानगादे या दोन गावांच्या नावातही बदल करण्याची मागणी पुढे येत आहे.
अठराव्या शतकात म्हणजे १६ नोव्हेंबर १८५३ रोजी इस्लामपूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती. इस्लामपूरचे नामांतर ईश्वरपूर करण्याची आग्रही मागणी नगरपालिकेत तत्कालिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून पन्नास वर्षापुर्वी करण्यात आली होती. यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरच्या सभेत जाहीरपणे ईश्वरपूर असा उल्लेख केला होता. शहरातील हिंदूत्ववादी संघटनांनी तेव्हापासून शहराचे नामांतर करण्याचा आग्रह धरला होता.
चार वर्षापुर्वी तत्कालिन नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांच्यासह कार्यकत्यार्ंनी ईश्वरपूर नामकरण करण्यासाठी आंदोलनही केले होते. अखेर राज्य शासनाने नामांतराचा निर्णय घेउन तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाकडून स्वागत झाले नसले तरी शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), आमदार सदाभाउ खोत यांच्या रयत क्रांती संघटना यांच्याकडून जोरदारपणे स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर गावच्या नावातील उरण हा मूळ गावचा शब्दच गायब होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र येत ईश्वरपूरच्या नावात उरणचाही समावेश करावा अशी आग्रही मागणी शक्तीप्रदर्शनाद्वारे करण्यात आली.
राजकीय पातळीवर शहराचे नाव बदलण्यासाठी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार्या आमदार पाटील यांनी फारसा आग्रह धरलेला नव्हता. सध्या शहराचा कारभार पाहणारी नगरपालिकाही अस्तित्वात नाही. यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून शहराचे नामांतर करत असताना मला विश्वासात घेतले नसल्याचा सांगत आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकभावना लक्षात घेउन नामांतराचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे सांगत या नाराजीला दुर्लक्षित केले.
इस्लामपूर नावाबद्दल हिंदूत्ववादी संघटनांचा आक्षेप असल्याने नामांतर करण्यात आले हे स्पष्ट आहे. मात्र, गावात भरणारा संंभूआप्पा यांचा उरूस हिंदू-मुस्लिम यांच्या ऐक्याचे गोडवे गाणारा आहे. संभूआप्पा हे मुस्लिम गुरू बुवाफन यांचे हिंदू शिष्य यामुळे उरूस मुस्लिम आणि हिंदू एकत्रितपणे साजरा करतात ही या गावची परंपरा आहे. यामुळे शहरात नामांतराला विरोध दिसून आला नसला तरी ईश्वरपूरच्या नावात उरण याचा समावेश करण्याची मागणीही पुढे आली आहे. यावर उरणचा समावेश की, उरण हे नाव इतिहासजमा होणार हे अंतिम निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.
इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्याचा निर्णय जाहीर होताच तीन साडेतीन शतकांपुर्वीच्या मुस्लिम सत्तेचा पगडा पुसून टाकावा यासाठी खानापूर आणि याच शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानगादे या दोन गावांची नावेही बदलण्याची मागणी पुढे आली आहे. गावाची नावे बदलून गावाची ओळख बदलली तरी नागरी प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे. नामांतरानंतर वेगळा निधी उपलब्ध होउन वर्षानुवर्षे सामान्यांना पडलेले प्रश्न सुटत असतील तर बरेच झाले. या नाव बदलाच्या निर्णयाचे आगामी नगरपालिका निवडणुकीत श्रेय मिळवण्याचे प्रयत्न होणार हे मात्र निश्चित यामुळे काहींनी जोरदार तर काहींनी हातचे राखून स्वागत केले.