Who is Mla Pooja Pal : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करणाऱ्या महिला आमदार पूजा पाल यांची समाजवादी पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली. पूजा यांना यापूर्वीही पक्षाने नोटीसी पाठवल्या होत्या; पण त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत, असं समाजवादी पार्टीने या पत्रकात म्हटलं आहे. यापुढील पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांना निमंत्रित केले जाणार नाही, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, कोण आहेत पूजा पाल? त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक नेमकं कशामुळं केलं? याबाबत जाणून घेऊ…

कोण आहेत आमदार पूजा पाल?

आमदार पूजा पाल या बहुजन समाजवादी पार्टीचे दिवंगत आमदार राजू पाल यांच्या पत्नी आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चैल विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. प्रयागराजच्या काठघर परिसरातील एका साध्या कुटुंबात पूजा पाल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील टायर पंक्चरचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी पूजा यांनी शिक्षणाबरोबर अनेक लहान-मोठी कामे केली. त्यांनी खासगी कार्यालयांमध्ये, रुग्णालयांत आणि घरांच्या साफसफाईचे काम केले. रुग्णालयात काम करत असतानाच त्यांची ओळख बहुजन समाज पक्षाचे नेते राजू पाल यांच्याशी झाली. हळूहळू दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १६ जानेवारी २००५ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर नऊ दिवसातच पतीची हत्या

लग्नानंतर अवघ्या नऊ दिवसांतच पूजा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. २५ जानेवारी २००५ रोजी दुपारच्या सुमारास अतीक अहमद यांच्या टोळक्याने राजू पाल यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबार राजू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येकडे राजकीय सूड म्हणून पाहिले गेले. कारण- काही दिवसांपूर्वीच राजू पाल यांनी अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अतीक अहमद यांचा भाऊ अशरफ अहमद यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. त्या वेळी पूजा फक्त २५ वर्षांच्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवन न्यायासाठीच्या लढाईत बदलले. अतीक अहमद टोळीच्या धमक्या आणि दबावाला न जुमानता त्यांनी पतीची राजकीय परंपरा पुढे नेण्याची शपथ घेतली.

आणखी वाचा : राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्याकडूनच मतचोरी? भाजपाने नेमके कोणते आरोप केले?

पूजा पाल यांचा राजकारणात प्रवेश

  • राजू पाल यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा झाली, तेव्हा बसपाच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी पूजा यांना उमेदवारी दिली.
  • या पोटनिवडणुकीत पूजा यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी आपला राजकीय प्रवास पुढे सुरूच ठेवला.
  • २००७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने पूजा यांना पुन्हा अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
  • या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवून पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला.
  • पुढे २०१२ मध्येही त्यांनी निवडणुकीत विजय मिळवत आपली आमदारकी कायम ठेवली.
  • २०१७ मध्ये मात्र भाजपाचे उमेदवार सिद्धार्थनात सिंग यांनी पूजा यांचा पराभव केला.
  • २०२२ मध्ये पूजा यांनी बसपाला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पार्टीत प्रवेश केला.
  • अखिलेश यादव यांनी कौशांबी जिल्ह्यातील चैल मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर पूजा यांनी विजय मिळवला.

अतीक अहमदविरुद्ध २० वर्षांची लढाई

पूजा पाल यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अतीक अहमदविरुद्धची लढाई हीच त्यांची प्रमुख ओळख ठरली. अतीक अहमद हा पाच वेळा आमदार आणि माजी खासदार राहिलेला होता. त्याच्यावर खून, खंडणी, अपहरण अशा १०० हून अधिक गुन्ह्यांचे आरोप होते. अनेक वर्षांपासून पूजा यांनी सत्ताधाऱ्यांवर अतीक अहमदला संरक्षण दिल्याचा आरोप केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे योगी आदित्यनाथ यांच्या हातात आल्यानंतर परिस्थिती बदलली. सरकारने संघटित गुन्हेगारीविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली. माफिया सरदारांशी संबंधित मालमत्ता पाडण्यात आल्या व त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. यावेळी अतिक अहमद व त्याच्या टोळीशी संबंधित अनेक महत्वाच्या सदस्यांना अटक करण्यात आली.

Who is Mla Pooja Pal
उत्तर प्रदेशच्या चैल मतदारसंघाच्या आमदार पूजा पाल (छायाचित्र पीटीआय)

२०२३ मध्ये अहमद बंधूंची हत्या

एप्रिल २०२३ मध्ये वकील उमेश पाल यांच्या खुनाच्या प्रकरणात वॉन्टेड असलेला अतीक अहमद याचा मुलगा असद हा झाशीमध्ये झालेल्या पोलीस चकमकीत ठार झाला. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी १५ एप्रिल रोजी अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे दोघेही पोलिसांच्या ताब्यात होते आणि त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोघे भावंड माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांच्या वेशात आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या, ज्यात अतीक आणि अशरफ दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींना- लवलेश तिवारी (वय २२) मोहित उर्फ सनी (वय २३) आणि अरुण मौर्य (वय १८) तातडीने घटनास्थळावरूनच अटक केली.

हेही वाचा : भाजपाच्या नेत्याची खासदारकी धोक्यात? काँग्रेसचा मतचोरीचा आरोप; प्रकरण काय?

पूजा पाल यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

सध्या उत्तर प्रदेश विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पूजा यांची हकालपट्टी अधिवेशनाच्या एका नाट्यमय घडामोडीनंतर झाली. चर्चेच्या १८व्या तासात त्यांनी सभागृहात उभे राहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याचे आभार मानले. “माझ्या पतीचा खून कसा झाला आणि कोणी केला हे सर्वांना ठाऊक आहे. जेव्हा कोणी माझं ऐकलं नाही, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ऐकलं. त्यांनी प्रयागराजसह माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय दिला आणि गुन्हेगारांना शिक्षा दिली. आज संपूर्ण राज्य मुख्यमंत्र्याकडे विश्वासाने पाहत आहे,” असं पूजा यांनी म्हटलं. व्हिजन डॉक्युमेंट २०४७ या विषयावरील मॅरेथॉन चर्चेदरम्यान पूजा यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धोरणामुळे २००५ मध्ये त्यांचे पती राजू पाल यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळाला.

पूजा पाल यांची समाजवादी पार्टीतून हकालपट्टी

दरम्यान, विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानंतर समाजवादी पार्टीने पूजा पाल यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. पूजा या सतत पक्षविरोधी कारवाया करत होत्या. अनेकदा देऊनही त्यांनी आपली विधाने थांबवली नाहीत. त्यांचे वर्तन पक्षविरोधी असून त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे. या कारणास्तव त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्या पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत किंवा त्यांना त्यासाठी आमंत्रित केले जाणार नाही, असं समाजवादी पार्टीने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.