हर्षद कशाळकर

अलिबाग : मांजर मारल्यावर पाप फेडायला काशीला जावे लागते असे म्हणतात. तसे अडीच वर्षांपूर्वी आम्ही भाजपचे मांजर मारून पाप केले होते, ते पाप धुण्यासाठी गुवाहाटीला गेलो होतो. आज शिवसेना भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा ऊर भरून आला. राज्यात शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार आले आहे. दोन वर्षांत अशी कामे होतील की जनताच आम्हाला पुन्हा निवडून देईल असा आशावाद आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

रेवदंडा येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे आयोजित मेळाव्यात शहाजी बापू पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. आपल्या रांगड्या भाषणात शहाजी बापू पाटील यांनी गुवाहाटीला जाण्यामागण्याच्या कारणांचा पुनरुच्चार केला. पन्नास आमदारांनी आग्रह केला म्हणून एकनाथ शिंदे यांना हा निर्णय घ्यावा लागला. शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही पाप केले नाही. झालेली चूक सुधारण्यासाठी गुवाहटीला गेलो. आम्ही पुण्यकाम केले. आम्ही चूक केली नाही.

हेही वाचा : मालेगावात १०० कोटींच्या कामांवरून दादा भुसे- शेख रशीद यांच्यात श्रेयवाद

आम्हाला बदनाम करण्यासाठी अनेक कारणे दिली जात आहेत. पण अडीच वर्षांपूर्वी प्रत्येकानी भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेसाठी मते मागितली होती. भाजपच्या मदतीनेच आम्ही निवडून आलो होतो. मिरवणुका निघाल्या. अंगावरचा गुलालही निघाला नव्हता तोवर ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या सोबत बसण्याची वेळ आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेऊन बसवले. अडीच वर्षांत एकही काम धड झाले नाही. निधी मिळत नाही. कोणी धड बोलायला तयार नाही. कोणी ऐकत नाही अशी गत झाली होती. आम्ही अडचणीत सापडलो. उध्दव ठाकरे यांच्यासमोर सगळी वस्तुस्थिती सांगितली. पण काही झाले नाही. शेवटी नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, शहाजी बापू पाटील म्हणाले.

हेही वाचा : ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त कोल्हापुरात विशेष तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावात डोंगरावर मंदिर असते, त्याला जाणाऱ्या वाटा वेगळ्या असतात. पण शेवटी त्या मंदिरात एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. त्यामुळे रस्ता कुठला चांगला हे निवडण्याचे काम कार्यकर्त्यांने करायचे असते. तेच आम्ही केले. टीका करणाऱ्यांना सांगतो की आम्ही आमचा पक्ष आणि जनतेशी प्रामाणिक आहोत. ज्या मतदारांनी आम्हाला आमदार केले त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक आहोत. कोणावरील रागामुळे हा उठाव केला नाही. बाळासाहेबांचे विचार कायम राहावेत म्हणून हा निर्णय घेतल्याचे शहाजी बापू यांनी सांगितले.आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी कामगार पक्षावर सडकून टीका केली. शेकाप हा हुकूमशाही आणि दहशतवाद याची गंगोत्री असलेला पक्ष आहे. त्यामुळे सतत तीच माणसे निवडून येत होती. आंदोलने करायची आणि नंतर भांडवलदारांशी हातमिळवणी करायची ही या पक्षाची कायम भुमिका राहिली आहे. त्यामुळे संधीसाधू राजकारणापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी रायगडमधील मतदारांना केले.