Gujarat Migrant Violence 2018 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १८ जुलै रोजी मिरा भाईंदर परिसरात जाहीर सभा घेतली. आपल्या भाषणातून त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून हिंदी सक्तीविरोधात जोरकसपणे भूमिका मांडली. परप्रांतीयांनी महाराष्ट्रात आल्यानंतर मराठीतच बोलावं… जमत नसेल तर लवकरात लवकर इथली भाषा शिकून घ्यावी… हिंदीची मुजोरी दाखवाल तर कानफडातच बसेल, असा इशारा राज यांनी दिला. मुंबईत एखाद्या परप्रांतीयाला त्याच्या चुकीने मारहाण झाली तर ती देशाची बातमी होते; पण जेव्हा गुजरातमधून बिहारी लोकांना मारहाण करून हाकलून देण्यात आलं तेव्हा त्याच्या बातम्या का झाल्या नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी राज ठाकरेंनी २०१८ मध्ये गुजरातमध्ये घडलेल्या एका घटनेचा दाखलाही दिला. त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…
२८ सप्टेंबर २०१८ साली गुजरातमध्ये काय घडलं?
२८ सप्टेंबर २०१८ मध्ये गुजरातच्या सांबरकाठा जिल्ह्यातील झुंजार या गावात एका १४ महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण गुजरातमध्ये संतापाची लाट उसळली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपी रविंद्र साहू याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला तडकाफडकी अटक केली. साहू हा मूळ बिहारमधील रहिवासी होता आणि काहीच महिन्यांपूर्वी तो शेतमजुरीच्या कामासाठी सांबरकाठा जिल्ह्यात आला होता. दरम्यान, आरोपी हा बिहारमधील असल्याने राज्यात गुजराती विरुद्ध बिहारी असा वाद निर्माण झाला.
गुजरातमध्ये परप्रांतीयांवर हल्ल्याच्या घटना
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीयांवर हल्ल्यांची मालिका सुरू झाली. गांधीनगर, सांबरकाठा, अहमदाबाद, मेहसाणा व पाटण जिल्ह्यात मोलमजुरीसाठी आलेल्या परप्रांतीयावरील हल्ल्याच्या घटना वाढल्या. त्यातच १३ ऑक्टोबर २०१८ रोजी केडिया गावात राहणाऱ्या एका बिहारी तरुणाची अज्ञातांनी हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरजित नावाचा तरुण हा रात्री उशिरा कामावरून घरी परतत होता, त्यावेळी अज्ञातांनी त्याला लोखंडी रॉडने जबर मारहाण करीत त्याची हत्या केली. अमरजितची हत्या याच घटनेच्या सूडापोटी करण्यात आली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. ही बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक उत्तर भारतीयांनी अखेर गुजरातमधून पळ काढण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा : INDIA आघाडीच्या बैठकीत मोदी सरकार विरोधात रणनीती ठरली? सर्वपक्षीय बैठकीत नक्की काय चर्चा झाली?
काँग्रेसच्या आमदाराला धरलं होतं जबाबदार
२०१८ साली गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार होते, तर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुशील कुमार मोदी यांच्याकडे होती. सांबरकाठा जिल्ह्यातील घटनेनंतर उत्तर भारतीयांना पिटाळून लावण्यात कुणाचा हात आहे, यावरून बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. भाजपाच्या नेत्यांनी या घटनेला त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले आमदार अल्पेश ठाकूर यांना जबाबदार धरले. आमदार ठाकूर यांनीच ही हिंसा घडवून आणली आणि बिहारी लोकांवर हल्ले करण्यास लोकांना प्रवृत्त केले, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. परप्रांतीयांमुळे राज्यात गुन्हेगारी वाढली आणि या लोकांमुळेच गुजरातमधील तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, अशी टीका करणारा अल्पेश ठाकूर यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता.
अनेकांवर गुन्हे, १७० हून अधिक लोकांना अटक
२०१८ मध्ये शिवानंद झा हे गुजरातचे पोलिस महासंचालक होते. गांधीनगर, सांबरकाठा, अहमदाबाद, मेहसाणा व पाटण जिल्ह्यात परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या शेकडो लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १७० हून अधिक जणांना अटक केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. सोशल मीडियावर द्वेषपूर्ण संदेश पसरविण्यात आल्यानंतर परप्रांतीयांवरील हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असेही त्यांनी सांगितले होते. हे संदेश पसरवणाऱ्या तिघांना पोलिसांनी शोधून काढलं होतं. तरीही ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडतच असल्यानं उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेल्या अनेकांनी गुजरातमधून बाहेर पडणंच पसंत केलं.

बिहारी महिला म्हणते, जमावाने आम्हाला बेदम मारहाण केली
अहमदाबादच्या चांदलोडिया परिसरातील महादेव नगर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय राजकुमारी जाटव या बिहारी महिलेनं त्यावेळी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, आम्ही मूळ बिहारचे रहिवासी असून माझे पती रंगकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या सात वर्षांपासून आम्ही या परिसरात राहत होतो. मात्र, सांबरकाठा जिल्ह्यातील घटनेनंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शेकडोंचा जमाव आमच्या परिसरात आला. त्यांनी नाव व जात विचारून आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, आम्ही जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढला. या घटनेनं माझी मुलं खूपच धास्तावली होती आणि मला त्यांना शांत करण्यासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेनंतर परिसरात राहणाऱ्या इतरही अनेक स्थलांतरित कुटुंबांनी पलायन सुरू केलं. गेल्या सात वर्षांत अशा प्रकारची भीती त्यांनी कधीही अनुभवली नव्हती, असं राजकुमारीने सांगितलं.
हेही वाचा : कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अटक; प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं?
२०१८ मध्ये शेकडो परप्रांतीयांचं गुजरातमधून पलायन
महादेव नगर परिसरात राहणारे धर्मेंद्र कुशवाहने त्यावेळी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, आमच्या परिसरात उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेशमधील स्थलांतरित कामगार राहत होते. एका रात्री १०० ते २०० जणांच्या टोळक्यांनी घरात घुसून परप्रांतीयांना मारहाण केली. या भीतीने एका आठवड्यातच सुमारे १५०० हून अधिक लोकांनी परिसर सोडण्याचा निर्णय घेतला. कुशवाह हा २० वर्षीय तरुण २०१६ मध्ये अहमदाबाद येथे कामानिमित्त स्थायिक झाला होता, त्याआधी तो सात वर्षांपासून सुरतमध्ये काम करीत होता. त्यानं सांगितलं की, काही लोक मुखवटे घालून माझ्या घरात शिरले आणि त्यांनी आम्हाला जबर मारहाण केली. तसेच दोन दिवसांत गुजरात सोडले नाही तर तुझा खात्मा करू अशी धमकीही त्यांनी मला दिली. दरम्यान, २०१८ साली गुजरातमधून जवळपास २० ते ३० हजार परप्रांतीयांना हाकलून लावण्यात आलं होतं, अशी माहिती त्यावेळी एका अहवालातून समोर आली होती. या घटनेनंतर बऱ्याच कामगारांनी गुजरात सोडला होता. काहीजण भीतीपोटी आजही गुजरातमध्ये पाय ठेवण्यास कचरतात, असं एका स्थानिकानं सांगितलं.