दापोली: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. शिवसेना पक्षप्रवेशाचा धडाकेबाज कार्यक्रमच शिवसेना नेते रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत यांनी हाती घेतला होता. आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांकडून कोकणात उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. थेट व्यासपीठावरूनच राज ठाकरे यांच्या शिलेदाराला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे खेडचे माजी नगराध्यक्ष व राज ठाकरे यांचे कोकणातील शिलेदार वैभव खेडेकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
रत्नागिरी खेड चिंचघर येथील कार्यक्रमात शिवसेना नेते रामदासभाई कदम, मंत्री शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार संजय कदम या सगळ्यांचे उपस्थितीतच थेट वैभव खेडेकर यांना ही ऑफर देण्यात आली आहे. या ऑफर नंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात वैभव खेडेकर यांनी केलेल्या काही मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांना थेट स्थगिती देण्यात आल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
खेड येथील माजी आमदार संजय कदम यांच्या चिंचघर गावात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांचे शिलेदार वैभव खेडेकर हे व्यासपीठावर उपस्थित असताना हे व्यासपीठ शिवसेनेसाठी असेच कायमस्वरूपी राहावं असं सांगत खेडेकर यांना पक्षप्रवेशाचे थेट निमंत्रण दिले. इतकच नाही तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आपल्या भाषणात वैभव खडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे. आपणच त्यांना त्यावेळी पहिल्यांदा राज साहेबांकडे घेऊन गेलो होतो, अशी आठवण सांगत ही सगळी आपलीच माणसं आहेत आणि म्हणून म्हणतो आपण सगळे एकाच कुटुंबातली माणसं आहोत, अशा शब्दात रामदास कदम यांनी वैभव खेडेकर यांचही कौतुक केलं वैभव खेडेकर यांना थेट शिवसेनेत पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे रामदास कदम व उदय सामंत या दोन्ही नेत्यांनी शिवसेना पक्षप्रवेशाच्या दिलेल्या ऑफर नंतर पुन्हा एकदा कोकणात रत्नागिरी राजकीय भूकंप होऊ घातल्याची चर्चा आता रंगली आहे.
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार आहेत. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर आहेत. इतकंच नाही तर राज्यातील पहिली खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा पुढाकार होता. ते खेडचे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. धडाडीचा व आंदोलनातील थेट भिडणारा कार्यकर्ता अशी त्यांची खास ओळख आहे. यापूर्वी त्यांचा संघर्ष हा थेट त्यांचे राजकीय गुरू शिवसेना नेते रामदास कदम यांच्याबरोबर राहिला आहे. पण अलीकडे हा संघर्ष निवळला आहे. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची मोठी क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्यसरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे वैभव खेडेकर यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाची विषयाची चर्चा सध्या सुरू झाली आहे. असं झाल्यास मनसेला मोठा धक्का कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत जाण्याच्या कितीही चर्चा असल्यातरी आपण महाराष्ट्र नव निर्माण सेनेतच राहणार आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याचा कोणताच विचार नाही. -वैभव खेडेकर, सरचिटणीस, महाराष्ट्र नव निर्माण सेना.