Modi Cabinet Expansion 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं, असं वृत्त न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. त्याचबरोबर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडही एप्रिलच्या अखेरीस होऊ शकते, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातून शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रीय मंत्रिपदासाठी उत्सुक आहे, त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात यापैकी कोणत्या पक्षातील नेत्याची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
भाजपाचे नवीन अध्यक्ष कोण असणार?
लोकसभेपाठोपाठ तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता बिहारच्या निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, त्याआधी पक्षातील संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होत असल्याचं दिसून येत आहे. भाजपातील संघटनात्मक निवडणुका अंतिम टप्प्यात असून लवकरच पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. त्यातच मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थानही देण्यात आलं आहे, त्यामुळे पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याचीच उत्सुकता भाजपातील नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना आहे.
अमित शाहांच्या बैठकीत काय चर्चा झाली?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (तारीख १५ एप्रिल) भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीन तास चर्चा झाली. भाजपाच्या काही नेत्यांनी ही एक नियमित बैठक असल्याचे सांगितले. मात्र, पक्षातील अंतर्गत सूत्रांनुसार, या बैठकीत तिन्ही नेत्यांनी भाजपामध्ये होणाऱ्या फेरबदलांवर सविस्तर चर्चा केली. बुधवारी अमित शाह, राजनाथ सिंह व भाजपाचे सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संघटनात्मक बदलांना अंतिम स्वरूप दिले, असेही सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा : President Rule : ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त होणार? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची का होतेय मागणी?
भाजपाच्या संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने पक्षातील संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्याचे ठरवले होते, त्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भाजपाने आतापर्यंत १५ राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. १९ एप्रिलपर्यंत आणखी सहा किंवा सात राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस भाजपा ज्या राज्यांमधील नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा करेल, त्यामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी २० एप्रिलनंतर नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कुणाची नावं चर्चेत?
केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांची नावे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत असून पुढील आठवड्यात यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत मागवले जाईल, असंही न्यूज १८ ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे, भाजपामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड आतापर्यंत एकमताने होत आली आहे. जर एखाद्या केंद्रीय मंत्र्याची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली तर मंत्रिमंडळातील जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मंत्रिमंडळातील जुन्या मंत्र्यांना राज्यात पाठवले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंत्रिमंडळातील काही मंत्रिपदे रिक्त होणार असून त्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असं न्यूज १८ ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातून कोणत्या पक्षाला मिळणार मंत्रिपद?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर भाजपाचे दोन्ही मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याची इच्छा बाळगून आहेत. बिहार निवडणुकीपूर्वी भाजपा उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षालाही केंद्रात मंत्रिपद देऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. काहींच्या मते, मोदी ३.० सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार आणि त्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : Murshidabad Violence : युसूफ पठाणवर का होतेय टीका? पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर काय घडलं?
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती मंत्री?
नितीन गडकरी (कॅबिनेट मंत्री), पियुष गोयल (कॅबिनेट मंत्री), रक्षा खडसे (राज्यमंत्री), मुरलीधर मोहोळ (राज्यमंत्री), शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री) यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही केंद्रात मंत्रिपद मिळण्याची इच्छा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत फक्त एकच जागा जिंकता आल्याने त्यांच्या पक्षाला मंत्रिपद नाकारण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळू शकतं, असा अंदाजही सूत्रांनी वर्तवला आहे.
मंत्रिमंडळात फेरबदल या तारखेनंतर होणार?
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा २१ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असतील. त्यानंतर २२ व २३ एप्रिलदरम्यान पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जातील. हा दौरा आटोपून भारतात परतल्यानंतरच भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होईल. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्यानंतर मंत्रिमंडळात अपेक्षित असलेले फेरबदल करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय स्तरावर उच्च बैठका सुरू आहेत, ज्यामध्ये भाजपाच्या पुढील अध्यक्षांची निवड, वक्फ सुधारणा कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी भाजपाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जर मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.