Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी उत्तर प्रदेशमधील अलीगढमध्ये सामाजिक सद्भभावनेसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन सामाजातील सर्व घटकांना केलं. मोहन भागवत हे पाच दिवसांच्या अलीगढ दौऱ्यावर आहेत. काय म्हणाले मोहन भागवत? मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये ‘एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी’ ही काळाची गरज असल्याचं म्हटलं आहे. “आजच्या काळात ‘एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी’ या आदर्शाचा स्वीकार केला पाहिजे आणि या माध्यमातून सामाजिक स‌द्भावनेसाठी प्रयत्न करायला हवा”, असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून एच. बी. इंटर कॉलेज आणि सासनी गेट भागात पंचन नगरी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात भागवत बोलत होते. दोन शाखांमधील स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना भागवत यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे आवाहन केलं. समाजातील सकारात्मक परिवर्तन केवळ समरसतेच्या माध्यमातूनच शक्य असल्याचे यावेळेस मोहन भागवत यांनी अधोरेखित केलं.

संस्कार हा हिंदू धर्माचा प्रमुख आधार-मोहन भागवत

हिंदू समाजाचा प्रमुख आधार असलेल्या संस्कारांचं महत्त्व भागवत यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं. “संस्कार हे हिंदू धर्माचा प्रमुख आधार असून या माध्यमातून परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि नैतिक तत्त्वांवर आधारित समाज घडवण्याची गरज आहे.” असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. तसेच असा समाज घडवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये केलं. संघाच्या सदस्यांना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचून अशा घटकांमधील सदस्यांना घरी आमंत्रित करावे असं मोहन भागवतांनी यावेळेस सांगितले. समाजातील सर्वच घटकांमधील लोकांना घरी बोलावल्यास या माध्यमातून एकतेचा संदेश दिला जाईल, असे भागवत यांनी नमूद केलं.

राष्ट्रवाद मजबूत करण्यासाठी सण साजरे करणं हा उत्तम मार्ग-मोहन भागवत

राष्ट्रवाद आणि सामाजिक एकतेचा पाया मजबूत करण्यासाठी सण साजरे करणे हा उत्तम मार्ग आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. भागवतांनी मोठ्या प्रमाणात सण साजरे करण्यास प्रोत्साहन दिल्याचं भाषणात मांडलेल्या मुद्द्यांवरुन अधोरेखित झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठ्या बिगर सरकारी संघटनांपैकी एक अत्यंत महत्त्वाची संघटना असल्याने भागवतांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

संघ प्रमुख मोहन भागवत यांचा दौरा १७ एप्रिल रोजी सुरु झाला. त्यांचा हा पाच दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यात ते संघाच्या प्रचारकांसोबत बैठका घेत आहे. आपल्या दौऱ्यात मोहन भागवत यांनी एच.बी. इंटर कॉलेज आणि पंचन नगरी पार्कमधील शाखांना भेट दिली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. आपल्या दौऱ्यात केलेल्या भाषणात मोहन भागवत यांनी सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने हिंदू समाजाने एक मंदिर, एक विहिर आणि एक स्मशानभूमी या तत्त्वांचा अवलंब करावा आणि सामाजिक एकता मजबूत करावी असं म्हटलं आहे.