नाशिक – आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपची ताकद दाखविण्यासाठी कटिबध्द आणि भाजपसाठी संकटमोचक अशी प्रतिमा तयार झालेले मंत्री गिरीश महाजन नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे स्वत:च संकटात सापडले आहेत.महापालिका निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक जागा मिळविण्याच्या महत्वाकांक्षेपोटी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाही भाजपमध्ये वाजतगाजत प्रवेश देण्याच्या महाजन यांच्या वृत्तीवर नाशिकमधील निष्ठावंत भाजप पदाधिकारीही आता गळ्यापर्यंत आल्यावर बोट ठेवू लागले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनीही नाशिकमधील गुन्हेगारीसाठी सत्ताधाऱ्यांना, त्यातही प्रामुख्याने गिरीश महाजन यांनाच लक्ष्य केले आहे.
राजकीय पाठबळामुळे फोफावलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एकदाची सुरुवात केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे यांना पोलिसी हिसका दाखवितानाच भाजपमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या मामा राजवाडे, ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांचा पुतण्या गौरव बागूल यांनाही पोलिसांनी मनावर घेतल्यास ते काय करु शकतात, हे दाखवून दिले. याशिवाय शिवसेनेचा नेता (एकनाथ शिंदे) माजी नगरसेवक पवन पवार, याशिवाय वादग्रस्त माजी नगरसेवक योगेश शेवरे, विक्रम नागरे यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. गुन्हेगार हा कायमच आपल्या बचावासाठी सत्ताधारी पक्षाला जवळ करण्याचा प्रयत्न करतो.
दुसरीकडे, राजकीय पक्षही निवडणुकीतील तात्पुरत्या लाभासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात प्रवेश देतात. महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्याची भाजपची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. नाशिकची जबाबदारी भाजपकडून सांभाळणारे गिरीश महाजन यांनी त्यासाठी पक्षात गुन्हेगारांनाही प्रवेश देत त्यांना पावन करुन घेण्याचे व्रत स्वीकारले. स्वपक्षीय आमदार सीमा हिरे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही वादग्रस्त सुधाकर बडगुजर तसेच सुनील बागूल, मामा राजवाडे यांना महाजन यांनी भाजपची कवाडे खुली केली. विजयादशमीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनात तर वादग्रस्त रम्मी राजपूतही दिसल्यावर ज्येष्ठ स्वंयसेवकांनी आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी हेच का फळ मम तपाला असेच म्हटले असेल. परंतु, वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचे भासवत महाजन यांनी स्थानिक पातळीवरील विरोधाची फिकीर केली नाही. मुळात स्थानिक भाजपच्या तीनही आमदारांचे गिरीश महाजन बिल्कूल धकवून घेत नाहीत, हेच वारंवार दिसते.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी नाशिकमधील गुन्हेगारीला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप केली. त्यांचा संपूर्ण रोख महाजन यांच्यावरच होता. त्यातच उत्तर महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने नाशिक येथे आलेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट संकटमोचक असलेल्या व्यक्तीने नाशिकची पूर्णपणे वाट लावल्याचा आरोप केला. विरोधकांच्या या आरोपांमुळे स्थानिक भाजपमधील जुन्या निष्ठावंतांना निश्चितच हायसे वाटले असणार. बाहेरचे ओझे किती दिवस सहन करायचे, अशीच एकूण त्यांची धारणा आहे.