Chirag Paswan Says Muslim voters support BJP : महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आगामी बिहारच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आतापासूनच निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी निवडणुकीतील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. याशिवाय निवडणूक आयोगाकडून राज्यात राबविण्यात येणाऱ्या मतदार फेरतपासणी मोहिमेवरही त्यांनी भाष्य केलं.

प्रश्न : बिहारमधील मतदार फेरतपासणीवर तुमचे मत काय?

चिराग पासवान म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्यामुळे जनतेच्या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे. मतदार यादीतून नाव वगळण्याच्या तक्रारी गंभीर असून त्याचा थेट परिणाम लोकशाही प्रक्रियेवर होऊ शकतो. मात्र, ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून त्यावर विरोधकांकडून केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर विरोधक नेहमीच आरोप करत आले आहेत की, मतदार यादी चुकीची आहे आणि याबाबत त्यांनी सातत्याने तक्रारीदेखील केलेल्या आहेत. आता जेव्हा निवडणूक आयोग या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करतंय, तेव्हा त्यांनाच त्यात अडचण का वाटते?”

चिराग पासवान यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

  • बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या ‘विशेष सखोल फेरतपासणी’ (SIR) प्रक्रियेवर विरोधक टीका करीत आहेत.
  • ही प्रक्रिया मागच्या दाराने लागू करण्यात येणारी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.
  • त्यावर उत्तर देताना चिराग पासवान म्हणाले की, विरोधकांना केंद्र सरकारने केलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत समस्या असते.
  • विरोधकांना घटनात्मक पदांवरही विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही मंत्री चिराग पासवान यांनी केली.
  • निवडणूक आयोगाकडून राबवली जाणारी ही एक नियमित प्रक्रिया असून, यावेळी ती अधिक व्यापकपणे केली जात आहे असंही ते म्हणाले.

आणखी वाचा : शशी थरूर यांची इंदिरा गांधींवर टीका; आणीबाणीसंदर्भात केलं भाष्य, काँग्रेसमध्ये काय घडतंय?

विरोधकांची वक्तव्ये दिशाभूल करणारी- चिराग पासवान

चिराग पासवान पुढे म्हणाले, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संदर्भात आम्हाला काही चिंता होत्या. माझ्या वडिलांच्या (स्व. रामविलास पासवान) नेतृत्वाखाली आमच्या पक्षाने केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा केली होती. आमचा मुख्य मुद्दा होता की, ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीत अशा लोकांचे काय? त्यावर आम्हाला खात्री दिली गेली की, अशा लोकांना अपील करण्याची संधी दिली जाईल आणि त्यांना आवश्यक ती मदतही मिळेल. विरोधकांकडून याबाबत खोटे आरोप केले जात असून ते दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत.”

भाजपाला मुस्लिमांच्या एका विशिष्ट गटाचा पाठिंबा– पासवान यांचा दावा

चिराग पासवान म्हणाले, “आमच्या पक्षाला (लोक जनशक्ती पार्टी) आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला मुस्लीम समुदायाचा नेहमीच पाठिंबा मिळत आला आहे. तुम्ही विश्वास ठेवता की नाही माहिती नाही, पण आजही मुस्लिमांमधील एक विशिष्ट वर्ग भाजपाला मतदान करतो. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक व वक्फ संबंधित कायदे हे आपल्या हितासाठीच आणले आहेत, असा विश्वास अनेक मुस्लिमांना आहे.” पासमंदा मुस्लीम समुदायासह मुस्लीम महिलांनीही भाजपाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे, असं चिराग यांनी यावेळी सांगितलं.

Union Minister chirag paswan
केंद्रीय मंत्री चिराग पासवान (छायाचित्र पीटीआय)

मुस्लीम मुख्यमंत्री व्हावा ही माझ्या वडिलांची इच्छा होती – चिराग पासवान

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीकडे मुस्लीम मतदारांनी पाठ फिरवली असा दावा काहींनी केला होता. त्यावर उत्तर देताना, “आमचा पक्ष एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर त्याचा मुस्लीम मतदारांवर काहीच परिणाम झाला नाही. बिहारमध्ये एखाद्या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली पाहिजे, अशी इच्छा माझ्या वडिलांनी (स्व. रामविलास पासवान) बोलून दाखवली होती. त्यामुळे मुस्लीम समाजातील मतदारांचा आमच्यावर विश्वास असून ते इतर कुणालाही मतदान करीत नाहीत. आम्ही प्रत्येक सरकारमध्ये त्यांच्या हिताचे रक्षण करीत आलेलो आहेत”, असं चिराग पासवान यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : राज ठाकरेंसाठी मविआशी युती तोडणार का उद्धव ठाकरे? का होतेय अशी चर्चा?

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले चिराग पासवान?

चिराग पासवान हे बिहारचे पुढील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या चर्चांचं लोक जनशक्ती पार्टीच्या प्रमुखांनी खंडन केलं आहे. ते म्हणाले, “मला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होण्याची कोणतीही इच्छा नाही; पण निवडणुकीनंतर माझ्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता राज्याचा उपमुख्यमंत्री व्हावा असं मला नेहमीच वाटतं. बिहारमधील मुख्यमंत्रिपदावर आम्ही कुठलाही दावा केलेला नाही. मला फक्त बिहारच्या विकासासाठी राज्याच्या राजकारणात परतायचं आहे, कारण बिहारी लोकांना आजही परराज्यात जाऊन काम करावं लागत असल्यामुळे आम्हाला आपल्या राज्यातच चांगला पायाभूत विकास करायचा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिराग पासवान पुढे म्हणाले, “मी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मला जाणवलं की, दिल्लीत बसून राज्यासाठी फारसं करता येत नाही. जर खरंच काही करायचं असेल, तर राज्यातच परतावं लागेल. त्यामुळे मी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहे; पण त्या संदर्भातील निर्णय पक्षाच्या नेत्यांना विचारात घेऊनच घेतला जाईल. माझ्यासारखे वरिष्ठ नेते जर विधानसभा निवडणूक लढवत असतील, तर पक्षातील संपूर्ण यंत्रणा फक्त त्या एकाच मतदारसंघावर केंद्रित करू शकते, ज्यामुळे इतर मतदारसंघावर दुर्लक्ष होऊ शकतं.” दरम्यान, चिराग पासवान हे बिहारच्या राजकारणात परतणार असल्याने ते नेमके कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.