अमरावती : आगामी महापालिका निवडणुकीत कुठल्याही पक्षासोबत युती करणार नाही, भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असा दावा भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असला, तरी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते पेचात सापडले आहेत.
नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे. या पक्षाने भाजपला विनाअट पाठिंबा दिला आहे. पण, स्थनिक पातळीवर रवी राणा यांना स्वीकारणे भाजपच्या इतर गटांना अजूनही जमलेले नाही. रवी राणा आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यामध्ये विस्तव जात नाही. नवनीत राणा आणि प्रवीण पोटे हे आता एका पक्षात आहेत. आमचे स्वतंत्र अस्तित्व आहे, असे रवी राणा सांगतात. नवनीत राणा आणि प्रवीण पोटे हे एका मंचावर दिसून येतात, मात्र रवी राणांसोबत एकत्र येणे पोटे टाळतात. प्रवीण पोटे यांच्याकडे आतापर्यंत शहराध्यक्षपदाची धुरा होती. त्यांना नुकतेच पद सोडावे लागले. डॉ. नितीन धांडे यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रवीण पोटे आणि नवनीत राणा यांच्याकडे शहरातील कोणतेही पद नाही, तरीही दोघे नेते आहेत. भाजपची सूत्रे ही राणा दाम्पत्याच्या हाती सोपवणे, हे भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचणारे नाही. पण, वरिष्ठ नेत्यांच्या हट्टासमोर कार्यकर्त्यांनाही मान डोलवावी लागणार आहे.
शहराध्यक्षांच्या पदग्रहण समारंभात नवनीत राणा यांनी भाजप स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढणार अशी घोषणा केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या, त्याचवेळी युवा स्वाभिमान पक्षाचे काय होणार, हा प्रश्नही उपस्थित झाला. युवा स्वाभिमानकडून अद्याप नवनीत राणांच्या वक्तव्यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते संभ्रमित आहेत.
भाजपला गेल्या महापालिका निवडणुकीत ४५ जागा मिळाल्या होत्या. हे आजवरचे उच्चांकी बहुमत होते. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गेल्या निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आले होते. या पक्षाला विस्ताराचे वेध लागले असले, तरी पक्षाच्या मर्यादा देखील आहेत. भाजपसोबत राहून पक्षाला फायदा होईल की स्वतंत्रपणे लढायचे, अशी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था आहे. रवी राणा याविषयी काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळची भाजपची परिस्थिती आणि सद्य:स्थिती यात बराच फरक आहे. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेत झालेली फाटाफूट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके यांचे वाढलेले बळ, यातून भाजपलाही ‘जागा’ शोधावी लागणार आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
भाजपचे अमरावतीत मजबूत संघटन आहे. आम्ही गेल्या महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळवली होती. भाजपाशी बांधील असलेल्या मतदारांचा मित्रपक्षांना मोठा लाभ मिळतो, हे विधानसभा निकालात दिसले आहे. बूथ स्तरापर्यंत संघटनात्मक बांधणी असताना स्वबळावर न लढल्यास भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची नेतृत्व करण्याची संधी हुकते. आमची महापालिकेत स्वबळावरच लढण्याची मानसिकता आणि तयारी आहे. – शिवराय कुळकर्णी, प्रवक्ते, भाजप.