छत्रपती संभाजीनगर : लातूर येथे ‘छावा’च्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादीने मारहाण केल्यानंतर कृषी मंत्री आणि अजित पवार यांचा गट शेतकरी विरोधी असल्याचा सूर उंचावला जाऊ लागला आहे. मारहाणीनंतरच्या काही वेळात मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू, राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांनी जखमी विजय घाडगे पाटील यांना दूरध्वनी केला. या मारहाणीनंतर राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढत असताना मराठवाड्यात राष्ट्रवादीची विविध कारणाने कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

शरद पवार यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष अशी मांडणी करत प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार बैठक घेणाऱ्या सुनील तटकरे यांना जनसुरक्षा विधयेकावरुन अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या मांडणीत विरोधाभास कसा, या प्रश्नावर विचारताना उत्तरे देताना तटकरे यांनना सारवासारव करावी लागली. जालना येथे कार्यकर्त्यांनी पक्षात दखल घ्यावी म्हणून घोषणाबाजी केली. बीडमध्ये माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तटकरेंच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. हिंगोलीमध्ये वसमतचे पदाधिकारी अधिक असल्याने आमदार राजू नवघरे यांनी शक्तिप्रदर्शन केले. लातूरमध्ये माणिकराव कोकाटेंच्या ऑनलाईन पत्ते खेळण्यावरुन झालेल्या राड्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गट शेतकरी विरोधी असल्याच्या मांडणीला सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्ये, त्यानंतर विधीमंडळाच्या सभागृहातील त्यांचे पत्ते खेळतानाचे चलचित्रण यामुळे राष्ट्रवादीला मराठवाड्यात प्रश्न विचारले जात आहेत. तटकरे यांचा धाराशिव आणि सोलापूर येथे दौरा होणे अद्यापि बाकी आहे. या दौऱ्यात धनंजय मुंडे यांचे पक्षातील स्थान अबादित असल्याचे तटकरे यांनी सांगितले. मात्र, ज्या लातूरमध्ये राष्ट्रवादीला ताकद देण्याचे मनसुबे आखले होते तिथे गोंधळ झाल्याने राष्ट्रवादीची कोंडी होताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना बळ देण्यात आले आहे. माजी मंत्री संजय बनसोडे हेही राष्ट्रवादीची पेरणी करत होते. मात्र, लातूरच्या बांधणीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेतकरी विरोधी असल्याचे चित्र निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. छावाच्या कार्यकर्त्यांस मारहाण म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलास मारहाण असे वक्तव्य विजय घाडगे यांनी केले. त्यानंतर शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आणि सोबतीला मनाेज जरांगे यांच्यामुळे राष्ट्रवादी विरोधाला धार दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारहाण झालेले कार्यकर्ते विजय घाडगे पाटील म्हणाले, ‘ राज्यात शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी किमान विधीमंडळात पत्ते खेळू नये, एवढेच सांगायचे होते. त्यांना पदावरुन दूर करून त्यांना घरी पत्ते खेळण्यासाठी एक डाव प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला. याचा राग आल्याने केलेली मारहाण ही शेतकऱ्यांच्या मुलास आहे.’