सुजित तांबडे

पुणे : राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असताना, सत्ताधारी ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाहीत. अशा कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐन दिवाळीत पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ‘साहेब, या वयात बाहेर फिरू नका’ असा सल्ला देणाऱ्यांना त्यांनी ‘कोण म्हणतो मी म्हातारा झालो? असा सवाल केला. या दौऱ्याने पवार हे राज्य सरकारविरूद्ध रान उठविण्यासाठी पुन्हा सज्ज झाल्याचे सूतोवाच केले आहे.

हेही वाचा >>> निवडणूक अजून लांब मग दिवाळीत खर्च कशाला? कोल्हापुरातील नेत्यांचे धोरण

भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ‘मिशन बारामती’ हे लक्ष्य केल्यावर पवार यांनी आतापर्यंत त्यांच्या शैलीत एखाद्याला शिरगणतीत न धरणारी प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त ‘मिशन बारामती’ला गांभीर्याने घेतलेले नाही. मात्र, राज्य सरकार अतिवृष्टीनंतरही शांत असलेले बघून, शेतकऱ्यांचा जाणता राजा अशी प्रतिमा असलेल्या पवारांमधील संघर्ष करणारा नेता जागा झाला आहे. राज्य सरकारच्या धोरणाविरूद्ध रान उठविण्यासाठी पवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यापासून सुरुवात केली असून, पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन संघर्षाला आरंभ केला आहे.

हेही वाचा >>>जळगाव : दिवाळीच्या किराणा वाटपावरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये राजकीय फटाकेबाजी

अतिवृष्टीमुळे पुरंदर तालुक्यातील परिंचे, वीर आणि काळदरी या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिंचे भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरण स्वीकारले जात नाही, अशी टीका करत त्यांनी राज्यातील नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकारला माहिती देणार असल्याचे जाहीर केले आहे.

यंदाच्या दिवाळीला विशेष महत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळीच्या निमित्ताने पवार कुटुंब हे बारामतीत गोविंद बाग येथे एकत्र येत असते. मतदार संघातील नागरिकांशी भेटीगाठी, राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद अशा सलग पाच दिवसांचे नियोजन असते. पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी नागरिकांची रीघ लागत असते. मात्र, भाजपच्या ‘मिशन बारामती’ची पार्श्वभूमी असल्याने नेहमीपेक्षा यंदाच्या दिवाळीला विशेष महत्त्व आले आहे. त्याची झलक पुरंदरच्या दौऱ्याद्वारे दिसून आली आहे. येत्या बुधवारी पाडव्याच्या दिवशी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.