सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सांगली दौरा पक्ष वाढीसाठी पोषक ठरला असल्याचे एकीकडे दिसत असले तरी गाजला तो इस्लामपूरातील राजकीय विरोधकांच्या टीकाटिपणीमुळेच असेच म्हणावे लागेल. बारामतीचे धुणे कृष्णाकाठी धुण्याचा प्रयत्न प्रथम आमदार रोहित पवार यांनी गावकी-भावकीच्या वादाला फोडणी देत केला. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनी या वक्तव्याला जोरदार फटकारे लगावत आपण आढीला पिकलेला आंबा नसल्याचे दाखवून देत आमदार जयंत पाटील यांनाही आपल्या नेहमीच्या गावठी भाषेत चोख प्रत्युत्तर दिले. ‘आपण कधीही इकडे तिकडे करणार नाही असे सांगत अखेरपर्यंत निकराने लढा देण्याचा वाळव्याचा इतिहास असल्याची राजकीय टिपणी अजितदादांना उद्देशून केली. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या भावकी-गावकीचा शाब्दिक वाद चांगलाच रंगला.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौर्याची सुरूवात आमदार पाटील यांचा गड असलेल्या इस्लामपुरातून झाली. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील म्हणजेच माई यांच्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा शैक्षणिक संस्थेचा कार्यक्रम त्यात पवार यांच्या नातेवाईकांचा कार्यक्रम होता. यामुळे या कार्यक्रमास सर्व पक्षिय नेतेमंडळी उपस्थित होती. माई पवार यांच्या नातेवाईक असल्याने आमदार रोहित पवारही उपस्थित होते. पुरोगामी चळवळीतील लढ्याचे नेतृत्व एनडी पाटील यांनी केले असल्याने सर्वांनाच या कुटुंबाबद्दल आदर असणे स्वाभाविकच आहे. त्यात श्रीमती पाटील या अजितदादांच्या आत्या. यामुळे या व्यासपीठावर राजकीय टीकाटिपणी होणार नाही असे वाटत असतानाच आमदार रोहित पवार यांनी अजितदादांनी गावकीपेक्षा भावकीकडे लक्ष द्यायला हवे असे सांगत दादांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तर आमदार पाटील यांनी वाळव्याला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असल्याचे सांगत स्वाभिमान कधी सोडत नसल्याचे सांगत अजितदादांच्या सरकारमध्ये सामील होण्याला आक्षेप घेतला.
या दोघांची भाषणे ऐकल्यानंतर अजितदादांनीही आडपडदा न ठेवता, दोघांनाही खडे बोल सुनावले. बोलावायचे आणि बिनपाण्याने तासायची हे शोभत नसल्याचे म्हणत रोहित पवार यांना आपण भावकीकडे दुर्लक्ष केले असते तर काय झाले असते याचा विचार कर असे सूचित केले. इस्लामपूरचा हा कार्यक्रम राजकीय वक्तव्यानी गाजला. आमदार पाटील यांच्याबाबत कायम संभ्रम निर्माण करणार्या बातम्या प्रसिध्द होत असतात. या कार्यक्रमामुळे ते नजीकच्या काळात सत्तेत सहभागी होतील असे दिसत नाही हे मात्र स्पष्ट झाले. तर रोहित आणि अजितदादा यां काका-पुतण्यातील बारामतीचा भावकी-गावकीचा वाद नजीकच्या काळात आणखी तीव्र स्वरूपात पुढे येण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
आता सांगली महापालिकेसह नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील यांनी वाळव्यात, महापालिका क्षेत्रात आमदार इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि ग्रामीण भागात जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जतमध्ये विलासराव जगताप, तमणगोंडा रविपाटील, आटपाडीत राजेेंद्रअण्णा देशमुख, शिराळ्यात शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळमध्ये अजितराव घोरपडे आदींनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या तरी महायुतीच्या माध्यमातून निवडणुक लढवली जाणार असल्याचे सांगितले जात असले तरी पक्ष विस्ताराचा प्रत्येकाचा हक्क अबाधित ठेवायचा असेल तर विस्तारासाठी पैस हवा आहे. यामुळे महायुतीमध्ये ओढाताण होणार हे स्पष्ट आहे. कदाचित प्रत्येकाला संधी मिळायला हवी असे जर ठरले तर महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारला जाउ शकतो. याच दिशेने प्रत्येक घटक पक्षाची वाटचाल सुरू आहे. विरोधक म्हणून काँग्रेस तर गलितगात्र झाल्याचे चित्र निर्माण झाले असून महापालिका क्षेत्रात तर काँग्रेसचे नेतृत्व खासदाराकडे की आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपयर्र्ंत काँंग्रेसच्या तंबूत आवकेपेक्षा जावकच अधिक पाहण्यास मिळणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या अभावाने निर्माण झालेल्या पोकळीवर अजित दादांची की शरद पवार यांची राष्ट्रवादी दावा करते हे निवडणुकीत दिसणार आहे.