सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचे मुख्य प्रतोद व माथाडी कामगारांचे नेते साताऱ्यातील आक्रमक व धाडसी कार्यकर्ते आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. काँग्रेस पक्ष अडचणीत असतानाही साताऱ्याचे प्रतापराव भोसले प्रांताध्यक्ष होते.
पक्षाच्या स्थापनेपासून सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला होता. साताऱ्याच्या बरोबरीने पश्चिम महाराष्ट्रानेही त्यांना मोठी साथ दिली. पवारांनीही सातारच्या बरोबरीने पश्चिम महाराष्ट्रालाही आज पर्यंत पक्ष संघटना आणि सत्तेत मोठे स्थान दिले. राज्यातील विरोधी पक्षां सारखीच स्थिती साताऱ्यातील पवारांच्या पक्षाची आहे. पक्ष स्थापनेनंतर
नऊ आमदार आणि दोन खासदार असणार्यी सातारा जिल्ह्यात आता पक्षाचा एकही आमदार आणि खासदार नाही. मोठ्या सहकारी संस्था पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात नाहीत. पक्षाच्या फुटी नंतर पक्षामध्ये मोठी पडझड झालेली आहे. पक्षाला मरगळ आलेली आहे आणि कार्यकर्ते दुरावलेले आहेत. जिल्ह्यामध्ये भाजपाने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता चांगले संघटन बांधले आहे.
मुंबई येथील माथाडी कामगारांचे नेते असणारे शिंदें १९९९ ते २००९ जावली तर मतदार संघ पुनर्रचनेनंतर २००९ ते २०१९ कोरेगाव विधानसभेचे आमदार होते. २००९ च्या कोरेगावच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी पवारांनी त्यांना जलसंपदा मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री व साताऱ्याचे पक्षाध्यक्ष म्हणूनही संधी दिली. यावेळी त्यांनी संघटन कौशल्य दाखवले होते. २०१९ मध्ये गुलालाची उधळण करत उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी पराभव केला. त्यानंतर त्यांना विधान परिषदेतून आमदारकी देण्यात आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उदयनराजे विरोधात शिंदेंना उमेदवारी दिली. यावेळी उदयनराजेंच्या सातारा शहरात शशिकांत शिंदेंनी केलेले शक्ती प्रदर्शन भुवया उंचावणरे होते. दोघातील लढत एकतर्फी होणार नाही याची जाणीव त्यांनी करून दिली होती. उदयनराजेंचा चाहता वर्ग आणि भाजपाच्या रणनीतीपुढे शशिकांत शिंदे यांचा टिकाव लागला नाही ते पराभूत झाले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या पक्षात फूट पडलेली होती. साताऱ्याच्या राजकारणावर यशवंतराव आणि पवार यांचा प्रभाव राहिला असताना तसेच पक्ष फुटीमुळे पवारांविषयी असणारी सहानुभूती शिंदेंना मतात परिवर्तित करता आली नाही . यशवंत, पुरोगामी विचाराच्या साताऱ्याने भाजपाला मदत करत उदयनराजेंना विजयी केले. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून भाजपाचे चार, शिवसेना शिंदे पक्षाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दोन आमदार झाले.
शिंदेंच्या जावळी वर सध्या श्री सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे आणि कोरेगाव वर शिवसेनेचे महेश शिंदे यांचे प्राबल्य आहे. पक्षफुटी नंतर जिल्ह्यातील पक्षाची सर्व सूत्रे शशिकांत शिंदेंकडे आली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना आक्रमकता दाखवता आलेली नाही. पक्षाची होणारी पडझड थांबविता आली नाही. लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठविला नाही, प्रभावी आंदोलने केली नाहीत. जिल्ह्यात व कोरेगाव जावळीत लोकांबरोबर नाळ राहिली नाही. जिल्ह्यात प्रमुख विरोधक म्हणून कोणताही प्रभाव दिसला नाही. जिल्हाभर दौरा आणि कार्यकर्ते मेळावे, कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. निवडणुकीनंतर अपवाद वगळता त्यांचे राजकारण हे नवी मुंबईच्या माथाडी संघाशी संबंधितच जास्त राहिले.
प्रतिस्पर्ध्यांना शह देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेऊन पवारांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीनंतर जिल्ह्यात मोठा असा जल्लोष दिसला नाही. ते पश्चिम महाराष्ट्रातही जयंत पाटील यांच्याप्रमाणे लोकाभिमुखही नाहीत.
निवडीनंतर त्यांनी राज्यभर दौरा करणार, गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार, प्रसंगी आंदोलन करणार, शिव शाहू फुले आंबेडकरांचे राजकारण पुन्हा उभे करणार असे सांगितले. पण त्यांना पहिला सातारा जिल्ह्याचा दौरा करावा लागेल. पक्षात झालेली पडझड, आलेली मरगळ, दूर करताना जुने लोक जोडत नवीन लोक पक्षाबरोबर आणावे लागतील. त्यांना उभारी देण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. पराभवा नंतर लोक बरोबर राहिलेले नाहीत. संघटनात्मक बांधणी करावी लागेल. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करताना मराठा समाजाचे आरक्षण आणि मराठा समाजाचे राजकारण नजरेसमोर ठेवले आहे. मराठा आणि माथाडींचं राजकरण करताना त्यांना शरद पवारांचे वलय किती बळ देणार हेही पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.