चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : काँग्रेस, राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने (शिंदेगट) लोकसभेसाठी उमेदवार देतानाही कमी-अधिक प्रमाणात घराणेशाहीची परंपरा पाळल्याचे त्यांनी दिलेल्या उमेदवारांवरून स्पष्ट होते.

विदर्भातील लोकसभेच्या दहा पैकी चार मतदारसंघात घराणेशाहीची परंपरा पुढे चालवणारे उमेदवार रिंगणात आहेत. अकोल्यात भाजपने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली. घराणेशाहीवर सर्वाधिक टीका भाजपकूडन केली जाते. त्यांचे वरिष्ठ नेते गांधी कुटुंबियांना या मुद्यावर लक्ष करतात. महाराष्ट्रातील नेतही यात मागे नाही, जिल्ह्यातअनेक ज्येष्ठ नेते असताना भाजपने अनुप धोत्रेला उमेदवारी देणे हे घराणेशाहीच्या पंरपरेला प्रोत्साहन देणारे आहे, अशी टीका आता या पक्षावर होत आहे. अकोल्यात भाजप, काँग्रेस व वंचित यांच्यात तिरंगी लढत आहे.

आणखी वाचा-Loksabha Election 2024: गरीब कुटुंबांना एक लाख रुपये ते ३० लाख युवकांना नोकरी, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने कोणती?

वर्धा मतदारसंघात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत आहे. मुळात या पक्षाची ओळखच काही राजकीय घराण्यांचा समूह अशी आहे, त्यात या पक्षाची वर्धेत ताकद त्त्यामुळे त्यांना उमेदवार आयात करण्याशिवाय पर्याय नव्हता. झालेही तसेच. पवार यांनी काँग्रेसमधून आयात केलेले अमर काळे यांना उमेदवारी दिली. ते करताना घराणेशाहीची परंपरा जपली. अमर काळे यांचे वडिल शरद काळे हे पूर्वाश्रमीच्या समाजवादी काँग्रेसचे म्हणजे पवार यांच्याच पक्षाचे आमदार. पवारांसोबत तेही काँग्रेसमध्ये आले. पण पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी मात्र शरद काळे त्यांच्यासोबत गेले नाही. पण आता पुन्हा पवार यांनी काळे यांच्या पुत्राला आपल्यासोबत घेतले. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व नंतर भाजपमध्ये गेलेले रामदास तडस यांच्यासोबत काळे यांची लढत आहे.

घराणेशाहीची वेगळ्या अर्थाने परंपरा चालवणारा उमेदवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आहे. २०१९ मध्ये राज्यातून काँग्रेसने जिंकलेली ऐकमेव जागा म्हणजे चंद्रपूर. येथून बाळू धानोरकर विजयी झाले होते. दुर्दैवाने त्यांचा संसद सदस्यत्वाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच मृत्यू झाला. या जागेवर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली. प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत, धानोरकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. तेथून ते काँग्रेसमध्ये आले. प्रतिभा धानोरकर यांची थेट लढत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे.

आणखी वाचा-पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील शिंदे शिवसेनेची घराणेशाही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. ती ठरवून झालेली नाही, पक्ष नेतृत्वाची अपरिहार्यता याला कारणीभूत ठरली. येथील उमेदवार जयश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेंमत पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी उमेदवारी मागितली नव्हती. पण त्यांचे पती हेंमत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आली. ही नामुष्की शिंदे सेनेवर आल्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी जयश्री यांना संधी मिळाली.