बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २२ ते २४ जानेवारीदरम्यान समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच २४ जानेवारी रोजी पाटणा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना नितीश कुमार यांनी कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर खोचक टीकाही केली. यावेळी त्यांनी नाव न घेता घराणेशाहीवरूनही टोला लगावला. दरम्यान, नितीश कुमारांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय म्हणाले नितीश कुमार?

“पंतप्रधानांनी रामनाथ ठाकूर (कर्पूरी यांचा मोठा मुलगा आणि जेडीयूचे राज्यसभा खासदार) यांना फोन करून कर्पूरी यांना भारतरत्न जाहीर झाल्याचे सांगितले. ही बातमी मला रामनाथ ठाकूर यांच्याकडून मिळाली. पंतप्रधानांनी मला फोन केला नाही, पण माध्यमांद्वारे मला पंतप्रधानांचे आभार मानायचे आहेत. मुळात आमच्या मागणीमुळे कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ दिला असे कोणीही म्हणू नये, पंतप्रधानांना याचे श्रेय घेऊ द्या”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली.

हेही वाचा – बंगालनंतर पंजाबमध्येही काँग्रेसला मोठा झटका; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती नसल्याचे केले स्पष्ट

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर खोचक टीकाही केली. “कर्पूरी ठाकूर यांच्याशिवाय आपलं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही, हे भाजपाला आता कळून चुकलं आहे. त्यांना आता कर्पूरी यांचे महत्त्व समजायला लागले आहे. खरं तर मी २००७ पासून कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करत होतो. अखेर ही मागणी आज पूर्ण झाली आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे”, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कोणाचंही नाव न घेता टोला लगावला. घराणेशाहीबाबत कर्पूरी ठाकूर यांचे विचार अधोरेखित करताना ते म्हणाले, “कर्पूरी ठाकूर यांनी कधीही त्यांच्या कुटुंबीयांना राजकारणात आणले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही त्यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांना राजकारणात येण्यासाठी विनंती केली. ते आता राज्यसभेचे खासदार आहेत. आम्ही त्यांचा खूप आदर करतो, पण आजकाल लोक आपल्या कुटुंबीयांनाच राजकारणात आणतात. पण, कर्पूरी ठाकूरांप्रमाणे मी कधीही माझ्या कुटुंबीयांना राजकारणात आणलेले नाही.”

विशेष म्हणजे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि आरजेडीवर भाजपाकडून सातत्याने घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जातो.

केंद्र सरकारने अतिमागास आणि इतर मागासवर्गीयांचा विचार करून धोरण निश्चित करावे, अशी मागणी करत नितीश कुमार म्हणाले, “आपण अनेकदा महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान नेत्यांबाबत बोलतो, पण कर्पूरी ठाकूर यांनी या महान लोकांच्या विचारांनुसारच राजकारण केलं. मीदेखील त्यांचीच विचारधार घेऊन राजकारण करतो. मी मागील १८ वर्षांपासून मुख्यमंत्री आहे आणि कर्पूरी ठाकूर यांचा वारसा पुढे नेण्याचं काम करतो आहे. या देशात अतिमागास जातीतील लोक इतर मागासवर्गीयांपेक्षा जास्त गरीब आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्यानुसारच धोरण तयार करावे”, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपाचे नितीश कुमारांना प्रत्युत्तर :

दरम्यान, या संदर्भात बोलताना भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला आहे. मुळात नितीश कुमार यांचे राजकारण आता संपले आहे. त्यांनी आता त्यांचा मित्रपक्ष असलेल्या आरजेडीला विचारावं की, लालू प्रसाद यादव केंद्रीय मंत्री असताना त्यांनी कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ का दिला नाही?”

पुढे बोलताना त्यांनी नितीश कुमार यांच्या एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. “नितीश कुमार भाजपाबरोबर येतील, अशी कोणतीही शक्यता नाही. या केवळ अफवा आहेत. या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही”, असे ते म्हणाले.

दरम्यान, दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जाते. देशातील अतिमागास (EBC) आणि इतर मागासवर्गीयांना (OBC) मिळालेल्या आरक्षणाचे प्रणेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. १९७८ साली मुख्यमंत्री असताना भारतीय जनसंघाच्या विरोधाला न जुमानता, त्यांनी राज्यात २६ टक्के आरक्षणाची तरतूद केली. यामध्ये अतिमागास वर्गाला १२ टक्के, इतर मागासवर्गीयांना आठ टक्के, महिलांना तीन टक्के आणि उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना तीन टक्के आरक्षणाचा समावेश होता.

हेही वाचा – “ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीची कल्पना करूच शकत नाही. कारण…”; ममतांच्या भूमिकेवर काँग्रेसची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशात लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या निर्णयाकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. भाजपाकडून कर्पूरी ठाकूर यांचे वैचारिक वारस आपणच असल्याची दावा करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकंदरीतच गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या विरोधानंतरही बिहार सरकारने जाती आधारित जनगणना करून भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला होता; तर आता भाजपाने कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देऊन नितीशकुमार यांचा डाव त्यांच्यावर उलटवण्याच्या प्रयत्न केला आहे.