कोणी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालयात सिद्ध होऊन शिक्षा होते, कोणी सरकारला भिकारी म्हणते, कोणी विधान परिषद सभागृहात भ्रमणध्वनीवर रमी खेळते, कोणाच्या डान्सबारवर पोलिसांचा छापा पडतो, कोणी नोटांच्या बॅगेचे दर्शन करतो, कोणी बदल्यांमध्ये ताव मारतो, कोणी बेकायदा वाळूचा उपसा करतो तर कोणी भोजन चांगले नाही म्हणून मारहाण करतो हे सारे चित्र आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील मंत्री व आमदारांचे. एवढे सारे प्रताप करूनही कोणावर कारवाई तर दूरच, उलट साऱ्यांचे सारे गुन्हे माफ!
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात कारवाई करण्याचे सुतोवाच गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले होते. पण मंगळवारी त्यांना पुन्हा असे वागू नका, असा इशारा देत माफ करण्यात आले. वास्तविक सरकारी सदनिकेसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे न्यायालयात सिद्ध होऊन दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली तरीही कोकाटे यांचे मंत्रिपद कायम राहते हेच मुळात चुकीचे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस हे आवाज उठवायचे. पण सध्या तर त्यांच्या मंत्रिमंडळात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले कोकाटे हे मंत्रिपदी आहेत. कोकाटे यांना खरे तर मंत्रिपदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही. तरीही पारदर्शक आणि स्वच्छ सरकारचा दावा करणाऱ्या फडणवीस मंत्रिमंडळात खोटी कागदपत्रे सादर करणारे मंत्रिपदी कायम राहतात. नुसती खोटी कागदपत्रे सादर केली नाही तर ज्या सरकारमध्ये आहोत त्यालाच भिकारी म्हणण्याचा प्रताप या कोकाटे महाशयांनी केला. पण त्यांच्या विरोधात काहीही कारवाई नाही. पुन्हा वेडीवाकडी विधाने करण्यास मोकळे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीसाठी हाॅटेल लिलावाची किंमत कमी करण्यात आल्याचा आरोप झाला. त्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली. एका चित्रफीतीत शिरसाट हे घरात बसले असताना समोर बॅगेत नोटांची बंडले दिसत होती. शिरसाट यांना सारे माफ.
गृहराज्यमंत्र्यांकडून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा. पण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्सबध्वर पडलेल्या छाप्यात बारबाला आढळल्या होत्या. गृहराज्यमंत्र्यांच्या डान्सबारमध्येच असे अनैतिक प्रकार सुरू असल्यास अन्य कोणाला दोष तरी कसा देणार ? कदम यांच्या कोकणातील महाविद्यालयाच्या आवारात बेकायदा उपसा केलेली वाळू आढळल्याचा आरोप झाला. डान्सबार, बेकायदा वाळू उपसा हे आरोप गृहराज्यमंत्र्यांवरच व्हावेत व्हावेत हे अधिक गंभीर.
आमदार संजय गायकवाड यांनी तर मारहाण करूनही त्यांच्या विरोधात काही कारवाई झाली नाही. संजय राठोड यांच्या जलसंधारण खात्यात बदल्या आणि कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या खात्यातील सुधारित प्रशासकीय मान्यतांना मध्यंतरी स्थगिती देण्यात आली. एवढे सारे होऊनही कोणावरही कारवाई नाही. फक्त नीट वागा, कारण तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला. विरोधकांच्या आरोपांवरून मंत्र्यांवर कारवाई झाल्यास विरोधकांना बळ मिळेल, असा महायुतीत मतप्रवाह आहे. यातूनच कोणाच्याही विरोधात कारवाई करण्यात आलेली नाही.