संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार असले तरी मुंबई महानगरपालिकेची सत्ता पटकविणे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी मोठे आव्हानात्मक असेल. मुंबई महानगरपालिकेत १९९७ पासून मार्च २००२ पर्यंत सलग २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. मुंबई शहरावर शिवसेनेची चांगली पकड आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे किंवा अन्यत्र मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत फाटाफूट झाली पण मुंबईत तेवढी फूट पडलेली नाही. काही नेत्यांनी शिंदे यांना साथ दिली असली तरी कार्यकर्ते अजूनही ठाकरे गटाबरोबर आहेत. मुंबईत शिवसेनेची पाळेमुळे रोवली गेलेली असल्याने शिवसेनेला हरविणे सहज सोपे नाही. मराठी माणसाच्या मनात अजूनही शिवसेनेबद्दल आपुलकीची भावना आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अधिक सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा >>> शिंदे गटाच्या खासदाराच्या विरोधात भाजपकडून संभ्रम

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक निश्चित कधी होईल याबाबत साराच संभ्रम आहे. कारण सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यास हिरवा कंदिल दाखविल्यावर पुढील सारी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. शिंदे सरकारने प्रभागांची संख्या पुन्हा २२७ केली. सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग संख्या घटविण्यास मान्यता दिल्यास पुन्हा प्रभागांची रचना करावी  लागेल. त्यावर हकरती व सूचनांना वेळ द्यावा लागेल. ही सारी प्रक्रिया पार पाडण्यास दोन महिन्यांचा कालावधी जाईल. यामुळे एप्रिल अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जाते. तोपर्यंत शिवसेनेला भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा भाजप व शिंदे यांचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>> पश्चिम बंगाल किंवा केरळप्रमाणे राज्य सरकार ‘ईडी’ चौकशीचा ससेमिरा मागे लागलेल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करणार का?

मुंबईत भाजपला आपल्या ताकदीवरच यश मिळवावे लागेल. मुंबईत शिंदे गटाची ताकद मर्यादित आहे. स्वत: शिंदे यांनी दबावाचे राजकारण करूनही मुंबईत शिवसेनेत मोठी फूट अद्याप पडलेली नाही. याशिवाय मुंबईतील शिवसैनिक शिंदे यांचे नेतृत्व मानण्यास तयार नाहीत हे गेल्या सहा महिन्यांत सिद्ध झाले आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्याकडे गेल्यास शिवसैनिकांमध्ये आणखी नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत. शिंदे यांच्या ठाण्यात अजूनही ठाकरे गटाचे आव्हान आहे. ठाण्यात शिंदे शिवसेना संपवू शकलेले नाहीत. मुंबईत तर शिंदे गटापुढे मोठे आव्हान असेल. शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पाडली असली तरी खाली अजूनही शिवसेनेची बांधणी पक्की आहे.

हेही वाचा >>> औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ, राष्ट्रवादीकडून ‘जुने पेन्शन’ योजनाच प्रचाराच्या केंद्रस्थानी

भाजपने १०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकसभेच्या सहाही मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. काही जागा या शिंदे गट तसेच रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडाव्या लागतील. गेल्या वेळी भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. भाजपला मराठी मतांची अधिक काळजी आहे. मराठी मतांमध्ये फूट पाडण्याकरिता  राज ठाकरे यांची या दृष्टीने मदत व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे.

भाजपने मोदी यांच्या करिष्म्याचा मुंबईत फायदा उठवण्यावर भर दिला आहे. शिवसेनेला राजकीयदृष्य्या शह दिल्याशिवाय भाजपला सत्ता मिळविणे सोपे नाही. यातूनच मुंबई महानगरपालिकेतील कारभाराची कॅगकडून चौकशी अथवा मुंबई महापालिका आयुक्तांचा ईडीकडून चौकशी या माध्यमातून शिवसेनेला अधिक बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबईची दैना झाली आहे त्याबद्दल शिवसेनेवर सारे खापर फाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एकूणच भाजपने मुंबई जिंकण्याचा निर्धार केला असला तरी सध्याचे चित्र तरी तेवढे सोपे नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not easy for bjp and shinde group to capture the power of mumbai municipal corporation print politics news ysh
First published on: 15-01-2023 at 09:37 IST