Omar Abdullah Rules Out alliance with BJP : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सूचक विधान केले. भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकार चालवण्यापेक्षा मी राजीनामा देणेचे पसंत करेन, असे अब्दुल्ला म्हणाले. भाजपाला काश्मीर सरकारमध्ये सामावून घेतले असते, तर परतफेड म्हणून आपल्याला त्वरित राज्याचा दर्जा मिळाला असता, पण ही तडजोड करण्यास तुम्ही तयार आहात का? माझी भाजपाबरोबर हातमिळवणी करण्याची माझी मुळीच इच्छा नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ओमर अब्दुल्ला यांच्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. काश्मीरमधील सत्ताधारी पक्षात फूट पडून सरकार तर धोक्यात येणार नाही ना? असे कयास अनेकजण बांधत आहेत.

ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. त्यानंतर तेथील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. तब्बल १० वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत ओमर अब्दुला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ४८ जागांवर विजय मिळवला; तर भाजपाला केवळ २९ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीचे बहुमतात सरकार आहे. मात्र, या सरकारमधील काही आमदारांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. काही आमदार हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

… तर मी राजीनामा देणंच पसंत करेन : ओमर अब्दुल्ला

मंगळवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दक्षिण काश्मीरमधील एका जाहीर सभेत बोलताना सरकारमधील आमदारांना उद्देशून सूचक विधान केले. “भाजपाला राज्यातील सत्तेत सामावून घेतले, तर काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. तुम्ही ही तडजोड करण्यास तयार आहे का हे मला सांगा. कारण- भाजपाबरोबर जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. राज्याला दर्जा मिळवण्यासाठी जर तसे करावे लागत असेल, तर मी राजीनामा देणे पसंत करीन. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही आमदाराला मुख्यमंत्री करून भाजपाबरोबर नवीन सरकार स्थापन करा. जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेपर्यंत मी वाट पाहण्यास तयार आहे,” असे ओमर अब्दुल्ला यांनी जाहीर सभेत सांगितले.

आणखी वाचा : BJP Defeat BTC Election : भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव; निवडणुकीत ४० पैकी २८ जागा गमावल्या, कारण काय?

मी कधीही परिस्थितीचा बहाणा केला नाही : ओमर अब्दुल्ला

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या पक्षातील मंत्र्यांसह आमदारांना, “धैर्य दाखवावे लागेल आणि लढावे लागेल”, असे आवाहन केले. “विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर माझ्याकडे दोन पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे भाजपाला सरकारमध्ये सामावून घेणे. २०१४ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईदसाहेबांनी आणि २०१६ मध्ये मेहबूबा मुफ्ती यांनी हाच मार्ग अवलंबला होता. दुसरा पर्याय म्हणजे माझ्यासमोर सरकार चालवताना अनेक अडचणी आल्या. तरीही मी कधीही परिस्थितीचा बहाणा केला नाही. सरकारमध्ये राहून काम करणे किती अवघड आहे हे फक्त मला माहीत आहे,” असे त्यांनी नमूद केले.

भाजपाला सरकारमध्ये अजिबात न घेण्याच्या भूमिकेवर अब्दुला ठाम

ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले, “२०१४ आणि २०१६ मध्येही भाजपाला सरकारपासून दूर ठेवता आले असते. मात्र, त्यावेळी बहाणा केला गेला की, जम्मूमध्ये विकासकामे करायची असल्याने भाजपाशी हातमिळवणी करणे गरजेचे आहे. आता कुणी कितीही तगादा लावला तरीही मी भाजपाला सरकारमध्ये घेणार नाही. भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकार चालविण्यापेक्षा मी राजीनामा देणेच पसंत करेन. आम्ही त्यांना सरकारमध्ये सामावून न घेताही जम्मू-काश्मीरमध्ये चांगली विकासकामे करीत आहोत.” यादरम्यान अब्दुल्ला यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्री, तसेच आमदारांचीही चांगलीच कानउघाडणी केली.

सरकारमधील मंत्री आणि आमदारांची अब्दुल्लांकडून खरडपट्टी

सरकारमधील मंत्री आणि आमदार सार्वजनिक ठिकाणी एक गोष्ट बोलतात आणि बंद दाराआड दुसरी गोष्ट बोलतात. कॅमेऱ्यासमोर तुम्ही अधिकाऱ्यांचे कौतुक करता आणि बंद खोलीत त्यांची निंदा करतात. यापुढे अशी दुटप्पी भूमिका मी अजिबात सहन करणार नाही. माझ्या खोलीत येऊन तुम्ही अधिकाऱ्यांबाबत जे बोलता, तेच बाहेरही बोला. माध्यमांसमोर सरकारी अधिकाऱ्यांबद्दल एक बोलणे आणि बंद दाराआड दुसरे बोलणे म्हणजे लोकांची फसवणूक करणे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंत्री, तसेच आमदारांची चांगलीच खरडपट्टी काढली.

हेही वाचा : BJP Ladakh Politics : लडाखच्या मुद्द्यावरून भाजपामध्ये धुसफूस; अनेकांची पक्षविरोधी भूमिका, मित्रपक्षांनीही सोडली साथ

कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये काय बदल झाले?

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवताना दहशतवादाचे कारण दिले होते. अनेक दशकांपासून या प्रदेशात दहशतवादी हल्ले वाढले होते. सरकारी आकडेवारीनुसार, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये मोठी घट झाली. २०२५ मध्ये भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या २८ दहशतवाद्यांचा नायनाट केला. २०२४ मध्ये हा आकडा ६४ होता. या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भारतीय लष्कराने या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने तो यशस्वीरीत्या हाणून पाडला. त्यानंतर पाकिस्तान आणि भारतात युद्धविराम झाला होता. काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये शांतता असून, जनजीवन सुरळीत सुरू आहे.