मनोज चंदनखेडे, लोकसत्ता
नागपूर: राजकारणात कायमचे मित्रत्व आणि शत्रुत्व नसते, असे म्हटले जाते. राजकीय स्वार्थापोटी वेगवेगळ्या पक्षातील नेते एकत्र येतात आणि त्यातून संधीसाधू युती जन्माला येते. याचाच प्रत्यय अलीकडेच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये आला. या निवडणुकांसाठी विदर्भातील चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस-भाजप युती, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती, तर भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीच्या अहेरीत भाजप-राष्ट्रवादी, तसेच अकोल्यातील काही बाजार समित्यांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची हातमिळवणी लक्षवेधी ठरली. ही संधीसाधू युती औटघटकेचीच होती की नव्या राजकीय समीकरणांची ती नांदी आहे, याबाबत विदर्भातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चंद्रपूर आणि राजुरा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपसोबत युती केली होती. येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे एकत्र आले. या युतीला आजी-माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विजय वडेट्टीवार यांचा आशीर्वाद होता. वडेट्टीवार आणि काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्यातील वैर आणि चढाओढ यासाठी कारणीभूत ठरली. मुनगंटीवार आणि वडेट्टीवार हे जिल्ह्यातील आणि राज्यातील कट्टर राजकीय विरोधक. वडेट्टीवार काँग्रेसचे महत्त्वाचे नेते. मात्र, त्यांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराविरोधात व्यूहरचना आखली.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी यांच्याशी हातमिळवणी करीत बाजार समितीत प्रवेश केला. त्यांनी सोबत काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनाही घेतले. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतही काँग्रेस-भाजप युती होती. या दोन्ही युतींमुळे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादी युतीतून बहुतांश बाजार समित्यांची निवडणूक लढवली गेली. या युतीसाठी कारण ठरले ते पटोले आणि पटेल यांच्यातील राजकीय वैर. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी या दोन नेत्यांतील वैर काही केल्या जात नाही. यामुळेच दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही या दोन नेत्यांमधील राजकीय वैर संपुष्टात येईल, अशी चिन्हे तूर्तास तरी नाहीच.
गडचिरोलीच्या अहेरी बाजार समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती मैदानात उतरली होती. राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपचे माजी मंत्री अम्ब्रीश आत्राम यांनी एकत्र येत येथे उमेदवार उभे केले होते. कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे आत्राम काका-पुतणे स्वहितासाठी सोबत आले.
अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, बाळापूर व मूर्तिजापूर या बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय (राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, ठाकरे गट आणि शिंदे गट) नेते एकत्र आले. या प्रमुख राजकीय पक्षांनी जणू ‘हम साथ, साथ है’चाच संदेश दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. स्थानिक समीकरणे या निवडणुकांसाठी कळीचा मुद्दा ठरतात. या निवडणुका शेतकरी हिताच्या असल्याचे ठासून सांगितले जात असले तरी राजकीय आणि स्वहितासाठीच या निवडणुकीत व्यूहरचना आखली जाते, हे सर्वश्रुतच आहे. या निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत गटबाजी, एकमेकांपेक्षा वरचढ ठरण्याची हव्यासा आणि मित्र पक्षांतील नेत्यांशी असलेले वैर, यातून नवे राजकीय डाव खेळले गेले. निवडणुकीचा निकाल लागला आणि वर नमूद केलेल्या संधीसाधू युतींना कुठे यश तर कुठे अपयश आले.
ही युती या निवडणुकीपुरतीच होती, असे हे नेते आता सांगत आहेत. आगामी काळात सध्या लांबणीवर पडलेल्या मात्र अटळ असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातील बहुतांश निवडणुकादेखील स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती पाहून लढवल्या जातात. या पार्श्वभूमीवर ही संधीसाधू युती नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पक्षाचे दिग्गज नेते आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरोधात विरोधी पक्षांच्या नेत्यांशी युती करून स्थानिक निवडणुका लढवत असतील तर या पक्षांनी आताच सतर्क होणे गरजेचे आहे. अन्यथा अशाच युती आणि आघाड्या आगामी निवडणुकांतही होतील, ही शक्यता नाकारता येणार नाही. तूर्त विदर्भातील बाजार समिती निवडणुकांतील हातमिळवणीचे राजकीय भवितव्य आणि परिणाम, याबाबात विविध तर्क लावले जात आहे.